रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 नवीन वंदे भारत एक्सप्रेसना झेंडा दाखवून केले रवाना


2030 पर्यंत, भारतीय रेल्वे प्रदूषणमुक्त असेल आणि निव्वळ कार्बन उत्सर्जन शून्य असेल :राज्यमंत्री व्ही सोमन्ना

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसने केला शुभारंभाचा प्रवास

Posted On: 16 SEP 2024 8:30PM by PIB Mumbai

कोल्हापूर, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे परिवर्तनाचा अनुभव घेत आहे आणि कोल्हापूर ते पुण्यादरम्यान वंदे भारत ट्रेनमुळे  या भागातील परिवहनाचे एक नवे युग सुरू होईल,असे रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांनी आज कोल्हापूर येथे सांगितले. कोल्हापूर येथून वंदे भारत ट्रेनला रवाना करण्याच्या समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पंतप्रधानांनी आज देशभरात आणखीही  वंदे भारत गाड्याना  झेंडा दाखवून रवाना केले.  

सोमण्णा यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसलाही अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 43  कोटी मिळाले आहेत.

2030 पर्यंत भारतीय रेल्वे प्रदूषणमुक्त होईल आणि तिचे कार्बन उत्सर्जन योगदान निव्वळ शून्य असेल, असे सांगून मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने आणि शाहू शहाजी छत्रपती यावेळी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रभात रंजन यांनी आभार प्रदर्शन केले.

आज रवाना करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन्सची सविस्तर माहिती

पंतप्रधानांनी आज 16.09.2024 रोजी भूज-अहमदाबाद वंदे मेट्रो, पुणे-एसएसएस हुबळी,कोल्हापूर-पुणे, नागपूर-सिकंदराबाद, आग्रा कँट-बनारस, रायपूर (दुर्ग)-विशाखापट्टणम आणि वाराणसी-प्रयागराज (भारतातील पहिली 20-डब्यांची वंदे भारत) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन यांना हिरवा झेंडा दाखवला.

पुणे-एसएसएस हुबळी आणि कोल्हापूर-पुणे दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सेवा कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्हीसाठी रेल्वे संपर्कव्यवस्थेमधील उल्लेखनीय प्रगती दाखवत आहे. पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील 11वी वंदे भारत ट्रेन आहे.

पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दोन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमधील संपर्कव्यवस्था मजबूत होईल. प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर  असलेले कोल्हापूर आणि एक प्रमुख आयटी  केंद्र आणि सांस्कृतिक केंद्र असलेले पुणे आता अधिक कार्यक्षम, आधुनिक रेल्वे सेवेसह पर्यटनाला चालना देईल.

अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये 530 प्रवाशांच्या आसनक्षमतेसह 8 कोच चेअर कार कॉन्फिगरेशन आहे. अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीमसह अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, प्रवासी अतिशय सुलभ, जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

वरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या नियमित वेळापत्रकाची माहिती खालीलप्रमाणेः

कोल्हापूर-पुणे- कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस(आठवड्यातून तीनदा)

ट्रेन क्रमांक 20673 कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस 19-09-2024 पासून (आठवड्यातून तीनदा) प्रत्येक (गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी) धावेल. ही गाडी कोल्हापूरहून सकाळी 8.15 ला सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 20674  पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस 18-09-2024 पासून (आठवड्यातून तीनदा) प्रत्येक (बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी) धावेल. ही गाडी पुण्याहून दुपारी 14.15 ला सुटेल आणि कोल्हापूरला त्याच दिवशी संध्याकाळी 19.40 वाजता पोहोचेल.

थांबेः मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा

या वंदे भारत "मेक इन इंडिया" वर अतिशय मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करून, रेल्वे प्रवासाच्या आधुनिकीकरणात भारताच्या प्रगतीचा दाखला ठरतील. ही आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा प्रादेशिक संपर्कव्यवस्थेत वाढ  करत असून आर्थिक महत्त्व वृद्धिंगत करण्याबरोबरच प्रवाशांना जागतिक दर्जाच्या  प्रवासाचा अनुभव देत आहे.


N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 



(Release ID: 2055465) Visitor Counter : 57


Read this release in: English