माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘एनएफडीसी’परिसरामध्ये थायलंड-एनएफडीसी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
Posted On:
14 SEP 2024 7:04PM by PIB Mumbai
‘एनएफडीसी’ अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एनएफडीसी’परिसरामध्ये 12 सप्टेंबर, 2024 पासून थायलंड-एनएफडीसी चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारत आणि थायलंड या देशांमध्ये चित्रपट आणि सांस्कृतिक विषयक देवाणघेवाण होणार आहे. चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि ब्रॉडकास्टिंग-2 चे संयुक्त सचिव प्रितुल कुमार आणि थायलंडचे महावाणिज्य दूत डोनाविट पूलस्वात यांच्या उपस्थितीत, छोट्याशा समारंभाने झाला.
एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी रामकृष्णन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी थायलंडचे महावाणिज्य दूत आणि त्या दिवसाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून दूरचित्रवाणी, चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मेघना मलिक या उपस्थित होत्या. 'ना आना इस देस लाडो' या लोकप्रिय मालिकेतील अम्माजींच्या भूमिकेमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी लाभली.तसेच या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले आहे. एनएसडी म्हणजेच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची पदवीधर असणा-या मेघना मलिक यांनी दोन दशकांहून अधिक काळ अनेक भूमिका केल्या. आपल्या अष्टपैलु आणि प्रभावशाली कला कारकीर्दीने त्यांनी मनोरंजन उद्योगावर अमिट छाप उमटवली आहे.

या चित्रपट महोत्सवामध्ये सहा थाई चित्रपट आणि तीन एनएफडीसीची निर्मिती असलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
आपल्या स्वागतपर भाषणात, रामकृष्णन म्हणाले, वेगवेगळ्या देशांमधील चित्रपटांचे समृद्ध वैविध्याचे प्रदर्शन करणारा हा एनएफडीसीचा उपक्रम असून, थायलंडबरोबर हा चौथा सहयोगी महोत्सव होत आहे. याप्रसंगी डोनाविट पूलस्वात यांनी चित्रपट महोत्सवाबद्दल आपण उत्साही असल्याचे सांगितले. चित्रपट दोन देशांच्या संस्कृतींना जोडणारा दुवा असतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून भावभावना शक्तिशाली पध्दतीने व्यक्त होतात, यावर त्यांनी भर दिला.

सायंकाळच्या सत्रामध्ये एनएफडीसी एनएमआयसी च्या व्यवस्थापक जयिता घोष यांनी झटपट प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन केले. यातील विजेत्यांना स्मृतिचिन्हे प्रदान केली. थायलंड दुतावासाच्या सौजन्याने गाई ता कराई आणि क्रा टोंग थॉन्ग यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या थाई पाककृतींचा आस्वाद अतिथींनी घेता आला.

या महोत्सवामध्ये पियापन चोपेच दिग्दर्शित थाई नाट्यमय चित्रकृती असलेल्या 'नेक्रोमॅन्सर'चित्रपटाचे सर्वात प्रथम प्रदर्शन झाले. पहिल्या दिवशी या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. त्यामुळे आगामी चित्रपटांविषयी सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
थायलंड-एनएफडीसी चित्रपट महोत्सव 15 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. यानिमित्त उभय देशांच्या चित्रपटांची प्रशंसा आणि परस्परांच्या भिन्न –सांस्कृतिक कला प्रवाहांची जोपासना साधली जाणार आहे.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055051)
Visitor Counter : 50