माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एनएफडीसी ने 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरुवात करण्यासाठी मुंबईत आयोजित केला रोड शो
भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या पदार्पणातील असामान्य कलाकृतीचा सन्मान करण्यासाठी 55 व्या इफ्फी मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार दिला जाणार
इफ्फी फिल्म बझार 2024: विजेत्या ठरलेल्या पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट सह-निर्मिती प्रकल्पांसाठी 20,000 डॉलर्सचे अनुदान
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमाॅरो: तरुण चित्रपट निर्मात्यांना 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
Posted On:
06 SEP 2024 5:50PM by PIB Mumbai
गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाची सुरुवात करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी), आज 06 सप्टेंबर रोजी मुंबईत पेडर रोड येथील एनएफडीसी च्या प्रांगणात एक रोड शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपट उद्योगातील तज्ञ, निर्माते, कौन्सुलेट जनरल आणि माध्यम व्यावसायिक उपस्थित होते.
इफ्फी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांनी यावेळी प्रेरणादायी बीज भाषण केले, यामध्ये त्यांनी आपला चित्रपट उद्योगातील प्रवास आणि महोत्सवाशी असलेला दीर्घकालीन संबंध उलगडला. एनएफडीसीचे सहव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी आगामी इफ्फी महोत्सवातील प्रमुख उपक्रमांची आणि उत्कंठावर्धक कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि उत्कृष्ट चित्रपट प्रकल्पांना मान्यता देणाऱ्या बहुप्रतीक्षित फिल्म बझार उपक्रमाचा समावेश होता.
रोड शो चे ठळक मुद्दे
इफ्फी 2024 चे पूर्वावलोकन:
आशियातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या 55 व्या इफ्फी महोत्सवाचे पूर्वावलोकन.
सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दिग्दर्शक पुरस्कार:
55व्या इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मधील भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या पदार्पणातील चित्रपटांना सन्मानित करण्याचा नवीन उपक्रम चित्रपट उद्योगातील नव्या प्रतिभेच्या वाढीला प्रोत्साहन देईल.
फिल्म बाजार 2024: इफ्फीच्या बरोबरीने आयोजित केल्या जाणाऱ्या फिल्म बाजार या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सह-निर्मिती बाजारपेठ विभागामध्ये, यावर्षी अव्वल तीन विजयी सह-निर्मिती प्रकल्पाना प्रथमच 20,000 डॉलरचे रोख अनुदान देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर संधी मिळावी, यासाठी फिल्म बाजार महत्वपूर्ण असून इफ्फीच्या आयोजनातील हा एक आवश्यक घटक बनला आहे.
‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी): सिनेनिर्मितीमधील विविध शाखांमध्ये 100 युवा प्रतिभावंतांना काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 10 सप्टेंबर 24 आहे.
एनएमआयसी -सहल आणि श्राव्य कार्यक्रम :
मुख्य सत्रानंतर, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विशेष आमंत्रितांसाठी राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएमआयसी) विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. एनएमआयसी सभागृहातील विशेष सत्रासाठी जमण्यापूर्वी उपस्थितांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास जाणून घेतला. यावेळी रामकृष्णन यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. सीएमओटीसारख्या आगामी उपक्रमांबद्दल आणि संचालकांच्या क्रियाकलापांबद्दल माहिती दिली. इफ्फीने दिलेल्या संधींचा लाभ घ्यावा यासाठी युवा प्रतिभावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले.
भारतीय सिनेसृष्टीचा 1952 पासूनचा समृद्ध वारसा इफ्फी जपत आहे; तसेच सिनेमासाठी इफ्फी एक प्रमुख जागतिक व्यासपीठ बनले आहे. आगामी 55 व्या आवृत्तीत महोत्सवाचा जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याचे, आंतरराष्ट्रीय सहकार्यांना चालना देण्याचे तसेच भारतीय आणि जागतिक स्तरावरील उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी वचनबध्द आहे. अधिक माहितीसाठी, https://www.iffigoa.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
***
S.Kane/R.Agashe/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052643)
Visitor Counter : 61