पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विकसित अर्थव्यवस्थांचे पर्यावरण सुद्धा विकसित असले पाहिजे; आपण पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेले नागरिक असले पाहिजे: केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 31 AUG 2024 6:44PM by PIB Mumbai

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आज मुंबतील भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीमध्ये 'आयडियाज फॉर लाईफ - लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट’ - या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कार्यक्रम, देशभरातील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि संशोधकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी “आयडियाज फॉर लाइफ” मध्ये कल्पना सादर करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगती या दोन्ही गोष्टींवर भर देण्याची गरज व्यक्त केली, “विकसित अर्थव्यवस्थांचे पर्यावरण सुद्धा विकसित असले पाहिजे, असे सांगून त्यांनी नागरिकांना पर्यावरणाबाबत संवेदनशीलता बाळगण्याचे आवाहन केले. “आपण पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेले नागरिक असले पाहिजे”, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्रीमहोदयांनी सरकारच्या मोहिमेची आणि आयडियाज फॉर लाईफ या संकल्पनेची माहिती दिली, ज्यामध्ये सर्व जीवांच्या एकत्रिकरणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी मानवाच्या गरजांपेक्षा ‘जीवन’ या संकल्पनेला अधिक विस्तारित करून सांगितले आणि सर्व सजीव व पर्यावरण यांच्या सहअस्तित्वाचे समर्थन केले.

विकासाच्या मानवकेंद्रित दृष्टिकोनावर त्यांनी टीका केली आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाचे समर्थन केले. वाढणारे तापमान आणि जैवविविधता गमावण्यासारख्या विकासाच्या प्रतिकूल परिणामांचा उल्लेख त्यांनी केला, आणि निसर्गाची अन्न, ऊर्जा, औषध आणि इतर स्रोतांची पूर्तता करण्यातील आवश्यक भूमिका अधोरेखित केली.

जैवविविधतेसाठी पृथ्वीचा एक-तृतीयांश भाग संरक्षित करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले आणि सांगितले की सुमारे 50,000 प्रजाती मानवी उपभोगासाठी वापरल्या जातात. त्यांनी शाश्वत विकासासाठी तीन आवश्यक क्रिया सांगितल्या, त्या म्हणजे : उपभोगाच्या मागण्या बदलणे, पुरवठा प्रणाली सुधारणे आणि प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करणे.

पर्यावरणाच्या आघाडीवरील भारताच्या यशांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की सरकारने आपल्या नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य, निर्धारित वेळेच्या नऊ वर्षे आधीच साध्य केले आहे आणि कृषीमध्ये रासायनिक वापर कमी करण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे.

जगभरात अन्न वाया घालवण्याच्या स्थितीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपले शिक्षण, नाविन्यता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती ही निसर्गाच्या संवर्धनावर केंद्रित असावी, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी, वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी आपल्या कल्पना आणि सूचना देण्याचे आवाहन केले, ज्यामुळे विकास धोरणांमध्ये पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी त्यांना योगदान देता येईल.

आयडियाज फॉर लाईफ

आयडियाज फॉर लाईफ च्या विचारमंथनात सात विषयांचा समावेश होतो - पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा, कचरा कमी करा, ई-कचरा कमी करा, एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा.

हे विचार सादर करण्यासाठी, ‘Ideas4Life.nic.in’ नावाचे एक समर्पित पोर्टल आयआयटी दिल्लीमध्ये 29 जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आले. या पोर्टलवर सहभागी होणारे आपल्या नवकल्पना ऑनलाइन सादर करू शकतात, ज्यामध्ये सातही विषयांबाबतच्या विजेत्या संकल्पनांना वैयक्तिक तसेच संस्थात्मक पातळीवर ओळख आणि पुरस्कार मिळतील.

आयआयटी मुंबईतील या कार्यक्रमाचे उद्दीष्ट मुंबई आणि त्यापलीकडील शैक्षणिक समुदायाला सक्रिय करणे होते तसेच भारतभरातील युजीसी, एआयसीटीई, आयआयटी आणि इतर शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे होते. युनिसेफ देखील मिशन लाईफ आणि आयडियाज फॉर लाईफ या उपक्रमाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा भागीदार आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी, महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनी, प्रत्येक व्यक्तीच्या कार्बन फुटप्रिंटच्या अहवालाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बायोडाटा मध्ये कार्बन फुटप्रिंटचा उल्लेख करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आयआयटी मुंबई परिसरामध्ये कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे अतिरिक्त सचीव अमनदीप गर्ग आणि या विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार यांनीही या कार्यक्रमात भाषण केले. मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे 1200 विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाले.

विचारमंथनाबरोबरच, आयआयटी मुंबईच्या परिसरात ‘एक पेड़ माँ के नाम’ या 5 जून 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनी सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले.

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

O

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050496) Visitor Counter : 49


Read this release in: English , Urdu , Hindi