अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयकर अधिकाऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुयोग्यपणे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये उपयोग करावा - राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ .विजेंदर कुमार यांचे आवाहन


नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयकर विभागात नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांच्या 'उत्तरायण 2024 'या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

Posted On: 23 AUG 2024 6:46PM by PIB Mumbai

नागपूर, 23 ऑगस्ट 2024

आयकर अधिकाऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) एआय टुल मार्फत शिकून त्याचा सुयोग्यपणे   आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी आज नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे केले.आयकर विभागात नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांच्या 'उत्तरायण - 2024 'या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते . याप्रसंगी अकादमीचे प्रशासकीय अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार , इंडक्शन विभागाचे अतिरिक्त महासंचालक सिद्धारामआप्पा कपट्टणवार, उत्तरायण 2024 च्या प्रशिक्षणाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगन  तसेच या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम संचालक हरिंदर कुमार वर्मा याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय हे कधीच ह्युमन इंटेलिजन्स - एचआय -मानवी बुद्धिमत्तेला हद्दपार करू शकत नाही.परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि गैरवापर आतील एक धुसर रेषा ओळखून अधिकाऱ्यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यावसायिक कौशल्यासाठी करावा असे आवाहन डॉ . विजेंदर कुमार यांनी यावेळी केले.नव्याने पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या त्यांच्या कार्यकाळातील अनुभवांची देवाणघेवाण करून एक तरी बेस्ट प्रॅक्टिस आपल्या सहकाऱ्यांकडून शिकून घ्यावी.अनुभव संपन्न अधिकारी हे आपल्या सहकाऱ्यांना कौशल आणि ज्ञान प्राप्त करून देण्याचा एक चांगला स्रोत आहेत असे देखील विजेंद्र कुमार यांनी स्पष्ट केले . अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करदात्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी कराव्यात असे सांगून त्यांनी आयकर विभागाच्या ऑनलाइन कर परतावा तसेच करभरणा पोर्टलचा  करदात्यांना होणाऱ्या सोयीबद्दलही आयकर विभागाचे कौतुक केले .

याप्रसंगी तुकडीचा अहवाल मांडतांना हरिंदर कुमार वर्मा ,प्रशिक्षण संचालक यांनी सांगितले की  8 जुलैपासून सुरू झालेल्या या 7 आठवड्याच्या प्रशिक्षण  कार्यक्रमामध्ये एकूण  131 सहाय्यक आयुक्तांपैकी  38 महिला अधिकारी आहेत .  सर्वाधिक अधिकारी हे महाराष्ट्र राज्यातील असून या तुकडीतील अधिकाऱ्यांचा सरासरी सेवाकाळ हा 28 वर्ष आहे.या तुकडीतील तरुण अधिकारी हे 47 वर्षाचे असून सर्वात जेष्ठ अधिकारी हे 59 वर्षाचे आहेत . उत्तरायण 2024 या सात आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यकाळात अधिकारी प्रशिक्षणार्थींना सायबर फॉरेन्सिक ,डिजिटल कंटेंट क्रिएशन  तसेच करप्रशासन याबाबत 6  आठवडे प्रशिक्षण दिले गेले तर सातव्या आठवड्यामध्ये 'भारत दर्शन ' च्या माध्यमातून  देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीशी अधिकाऱ्यांना ओळख करून देण्यात आली .

याप्रसंगी तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आपले प्रशिक्षणाबद्दलचे अनुभव कथन केले. सिदारमप्पा ,अतिरिक्त महासंचालक यांनी तुकडीला कर्तव्यनिष्ठेची शपथ दिली.

याप्रसंगी डॉ. विजेंदर कुमार आणि  मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठीचे प्रधान महासंचालक सुवर्णपदक हे चंद्रदेव सिंग या अधिकारी प्रशिक्षणार्थींना देण्यात आले तर सर्वांगीण उत्तम कामगिरीसाठी दिले जाणारे प्रधान महासंचालक सुवर्णपदक हे जयंती खंडोदिया या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमला भटकर ,सहाय्यक अभ्यासक्रम संचालक यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभ्यासक्रम समन्वयक श्रीमती अलाईस मॅथ्यूज यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे कुटुंबीय आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

 

 

S.Rai/D.Dubey/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2048248) Visitor Counter : 58


Read this release in: English