नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीएला भेट; जेएनपीए सेझच्या सातव्या टप्प्यातील ई-लिलावासाठी दिलेले पत्र केले जारी, महत्त्वाच्या पर्यावरणीय शाश्वतता प्रकल्पांचे केले उद्घाटन


सोनोवाल यांनी जेएनपी प्राधिकरणाद्वारे विकसित वाढवण स्किलिंग प्रोग्रामच्या व्हॉट्सॲप चॅटबॉटचे केले उदघाट्न

पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी जेएनपीए, वाढवण बंदर आणि आरईसी यांच्यात सामंजस्य करार : सर्बानंद सोनोवाल

वाढवण बंदरामुळे सागरी राष्ट्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित होईल- सर्बानंद सोनोवाल

Posted On: 22 AUG 2024 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 22 ऑगस्ट 2024

 

पालघरजवळच्या वाढवण बंदरामुळे सागरी राष्ट्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित होईल, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी आज मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (जेएनपीए) आज (22 ऑगस्ट 2024) भेट दिली. वाढवण बंदराच्या माध्यमातून 10 लाख रोजगार निर्माण असून या बंदरामुळे उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. मच्छिमारांच्या हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी आणि कार्यबल विकास वाढवण्यासाठी, सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपी प्राधिकरणाद्वारे विकसित वाढवण स्किलिंग प्रोग्रामच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे उदघाट्न केले. कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी, वाढवण बंदराबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी, आणि जेएनपी प्राधिकरणाला भेट देण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे विकसित करण्यात आले आहे. या चॅटबॉटचा मुख्य उद्देश मौल्यवान डेटा गोळा करणे आणि वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासोबत निर्माण होणाऱ्या रोजगार संधींशी संबंधित प्रशिक्षण मिळवण्यास वाढवणच्या तरुणांना प्रेरित करणे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे 10 लाख रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित संस्थांशी सहयोग साधून व्यापक कौशल्य विकास कार्यक्रम देण्यात जेएनपीए प्राधिकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

या भेटीदरम्यान, सोनोवाल यांनी स्मार्ट सेझ प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाची उद्दिष्टे म्हणजे परिसरातील घुसखोरी टाळणे, वाहनांच्या शिस्तबद्ध हालचाली सुनिश्चित करणे, प्रवेशद्वारावरचे कामकाज सुकर करणे, सर्व कर्मचारी व वाहनांच्या आगमन-निर्गमन वेळेचे निरीक्षण करणे, आणि एल ए एन वापरकर्त्यांसाठी सर्व युटिलिटी इमारतींना नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. तसेच, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट पथदिवे, स्मार्ट पार्किंग आणि वेटब्रिजेस यासारख्या भविष्यातील अनुप्रयोगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करणे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सोनोवाल यांनी जेएनपी प्राधिकरण सेझ येथे 'एक पेड़ माँ के नाम' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले.

सोनोवाल यांनी आज प्राधिकरणाला दिलेल्या भेटीत सेझ वटहुकम धारकांना पत्र जारी केले. जेएनपी प्राधिकरणने 7 टप्प्यांत भूखंडांचे वाटप केले आहे. टप्पा 7 मध्ये 57 एकरांसाठी अलीकडेच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. 21 बोलीदारांनी 6 युनिट प्लॉट्स आणि 3 सह-विकासक प्लॉट्ससाठी बोली सादर केल्या. विशेष म्हणजे, राखीव किंमतीपेक्षा एकूण 95.23% ने कोट केलेल्या मूल्यामध्ये वाढ झाली, त्यामुळे प्राधिकरणासाठी राखीव किंमतीपेक्षा 63% जास्त महसूल वाढ झाली. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये जेएनपी सेझने 8049 TEUs सहित एकूण 15000 कोटी रुपयांची आयात-निर्यात केली असून यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 300% वाढ झालेली आहे.

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 230 प्रकल्प पूर्ण झाले असल्याची माहिती सोनोवाल यांनी यावेळी दिली. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत उचललेली पावले यशस्वी ठरली असून वर्ष 2030 पर्यंत बलशाली सागरी राष्ट्र म्हणून भारताचा नावलौकिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोनोवाल यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. एक करार जेएनपी प्राधिकरण, वाढवण बंदर, आणि आरईसी यांच्यात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठबळ देण्याकरिता कर्ज वितरणासाठी झाला तर दुसरा करार गेटवे टर्मिनल्स इंडिया (GTI) आणि जेएनपी प्राधिकरण यांच्यात जहाजांसाठी तटीय वीज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी झाला. या करारांमुळे जेएनपी प्राधिकरणाच्या पर्यावरणीय शाश्वत बंदर संचालनासाठीच्या प्रतिबद्धतेला बळ मिळाले आहे. या करारांबाबत सोनोवाल म्हणाले  ''जेएनपीए, वाढवण बंदर आणि आरईसी यांच्यात तसेच जेएनपीए आणि जीटीआय यांच्यात दोन महत्त्वपूर्ण करारांवर आज स्वाक्षरी झाली. यामुळे पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी  तसेच शाश्वततेच्या दिशेने मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ लाभेल. आपली बंदरे व्यापार अविरत ठेवत आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान बळकट करत भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी समर्पित आहेत. देशाच्या भावी पिढ्यांसाठी अत्यंत जबाबदारीने आर्थिक विकास साधणे आणि आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करणे यासाठी शाश्वततेच्या दिशेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आमचे मंत्रालय  काम करत आहे असे सोनोवाल म्हणाले.

परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरुज्जीवन प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच, बंदरातील विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. बंदरावर आगमन झाल्यानंतर, प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले.

प्राधिकरणच्या पर्यावरणीय शाश्वततेप्रती प्रतिबद्धता अधोरेखित करत सोनोवाल यांनी बंदराच्या परिसरातील तीन महत्त्वपूर्ण जलाशयांचे उदघाट्न केले. यामध्ये प्रशासन इमारत पायथ्याचे सरोवर आणि सिपीपी सरोवरांचा समावेश आहे. पावसाच्या पाण्याचे संचयन आणि परिसंस्था पुनरुज्जीवनासाठी हे जलाशय महत्त्वपूर्ण आहेत. सोनोवाल यांनी जसखार सरोवराच्या भूमिपूजनाचा देखील शुभारंभ केला. या सरोवरांना महाराष्ट्रातील महान संत, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज यांची नावे दिली गेली आहेत.

जेएनपी प्राधिकरण राष्ट्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, व्यापार सुलभ करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळींमध्ये आपली भूमिका मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

 

जेएनपी प्राधिकरण :

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापना झाल्यापासून, जेएनपी प्राधिकरण एक बल्क कार्गो टर्मिनलवरून देशातील प्रमुख कंटेनर बंदरात रूपांतरित झाले आहे.

सध्या, जेएनपी प्राधिकरण पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते - एन एस एफ टी , एन एस आय सी टी, एन एस आय जी टी, बी एम सी टी आणि ए पी एम टी बंदरात सामान्य मालवाहतुकीसाठी उथळ पाण्याचा बर्थ देखील आहे. जेएनपी प्राधिकरण पोर्टवर उपस्थित असलेले लिक्विड कार्गो टर्मिनल बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टियमद्वारे व्यवस्थापित केले जाते. याव्यतिरिक्त, नव्याने बांधलेला किनारी धक्का इतर भारतीय बंदरांना जोडतो आणि किनारपट्टीवरील कंटेनरची वाहतूक वृद्धिंगत करतो.

277 हेक्टर जमिनीवर वसलेले, जेएनपी प्राधिकरण भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह, काळजीपूर्वक डिझाइन केलेले बहुउत्पादक विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) देखील चालवते.

जेएनपी प्राधिकरण महाराष्ट्रातील वाढवण येथे सर्व हवामानात काम करण्यायोग्य, 20 मीटर नैसर्गिक खोल, ग्रीनफिल्ड पोर्ट विकसित करत आहे. हे जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ठ 10 बंदरांमध्ये स्थान मिळवणार आहे आणि स्थापनेपासून 100% हरित बंदर असेल.

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047785) Visitor Counter : 72


Read this release in: English , Urdu , Hindi