रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेने 78 वा स्वातंत्र्य दिन केला साजरा
जगजीवन राम रुग्णालयात नूतनीकरण केलेल्या डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) कॅथ लॅबचे पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केले उद्घाटन
Posted On:
15 AUG 2024 6:33PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2024
पश्चिम रेल्वेने आज मुंबईतील चर्चगेट येथील मुख्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी राष्ट्रीय ध्वजारोहण करून समारंभाची सुरुवात केली. कार्यक्रमात सर्वप्रथम रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांचे औपचारिक संचलन झाले.

महाव्यवस्थापक मिश्रा यांनी याप्रसंगी केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पश्चिम रेल्वेची अलीकडच्या काळातील कामगिरी आणि टप्पे यावर प्रकाश टाकला. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी या बलिदानाच्या वारशातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. मिश्रा यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वे नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संस्थेच्या (WRWWO) अध्यक्ष क्षमा मिश्रा यांनी जगजीवन राम रुग्णालयाला वॉटर प्युरिफायर आणि शिलाई मशीनसह आवश्यक उपयुक्त वस्तू भेट दिल्या. पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. कोंडा अनुराधा यांनी या भेटवस्तू स्वीकारल्या. या प्रसंगी देशभक्तीपर संकल्पना साजरी करणाऱ्या संगीत आणि नृत्याविष्कारासह एक चैतन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला.
पश्चिम रेल्वेचे तीन अधिकारी आणि एका अधिकाऱ्याच्या पत्नीसह चार डब्ल्यूआर ऍथलीट लडाख मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका विशेष उल्लेखनीय घोषणेद्वारे पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जी) उज्ज्वल देव यांनी दिली. हे खेळाडू वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या बॅनरखाली पूर्ण मॅरेथॉन (42 किमी), खारदुंगला चॅलेंज (72 किमी), आणि सिल्क रूट अल्ट्रा (122 किमी) यासह विविध श्रेणींमध्ये सहभागी होणार आहेत.

यावेळी पश्चिम रेल्वेचे आयजी तसेच प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, अजोय सदनी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी, विभागांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.
नंतर, महाव्यवस्थापक मिश्रा यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयाला भेट दिली. तिथे त्यांनी नूतनीकरण केलेल्या डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) कॅथ लॅबचे उद्घाटन केले. त्यांनी नॅशनल एक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल ऍन्ड हेल्थकेअर (एनएबीएच) च्या मान्यतेच्या यशस्वी अंमलबजावणीची प्रशंसा केली आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयाची बांधिलकी अधोरेखित केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. कोंडा अनुराधा, जगजीवन राम रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. ममता शर्मा, इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045700)
Visitor Counter : 39