विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचा प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
चेन्नई येथे देश आणि परदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवर, व्यावसायिक तसेच वैद्यकांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात झाले पुरस्काराचे वितरण
Posted On:
28 JUL 2024 3:31PM by PIB Mumbai
मधुमेहशास्त्राची प्रगती, मधुमेह या आजारात घ्यायची काळजी आणि मधुमेह संशोधन या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि दिलेल्या समर्पित योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देश-विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, आघाडीचे व्यावसायिक आणि वैद्यकांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
चेन्नईच्या डॉ. मोहन डायबेटीस स्पेशॅलिटी सेंटरचे आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांचा परिचय असलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. जितेंद्र सिंह मधुमेहशास्त्र (डायबेटोलॉजी)चे शिक्षक प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक आहेत. तळागाळातून सुरूवात करून डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही उंची गाठली आणि आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव काढले, असे त्या सन्मानपत्रात म्हटले आहे. थोर आणि प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. बी.सी. रॉय यांच्याच तोडीचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे योगदान असून ते रॉय यांच्या पंगतीतले आणखी एक राष्ट्रीय पातळीवरचे दुर्मिळ उदाहरण आहे, असे त्यात नमूद केले आहे. लोकसभेवर सलग तीन वेळा निवडून जात सार्वजनिक जीवनात डॉ. जितेंद्र सिंह तितकेच यशस्वी आणि लोकप्रिय झाले. देशातील काही जणांनाच हे शक्य झाले तर केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा स्थान मिळवणारे ते जम्मू काश्मीरातील पहिलेच उदाहरण आहेत. स्वच्छ, निष्कलंक प्रतिमा आणि सचोटीसाठी ओळखले जाणारे डॉ जितेंद्र सिंह यांनी तीन पिढ्यांतील सहकाऱ्यांसोबत काम केले असून त्यांचा आदर आणि प्रेम मिळवले आहे.
आरएसएसडीआय (रीसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया) या डायबेटोलॉजिस्टच्या सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे आजीवन सदस्य म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांना मिळालेल्या सन्मानाचा उल्लेखही या सन्मानपत्रात आहे.
ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय शिक्षक, लेखक आणि उत्तम वक्ता म्हणून परिचित आहेत, असेही त्यात नमूद केले आहे. आत्तापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, (JIPMER) पुडुचेरी कडून सुवर्ण पदकाचा समावेश आहे. पत्रकारितेसाठी त्यांना प्रतिष्ठेचा "जमना देवी ज्ञान देवी पुरस्कार" मिळाला आहे. डॉ जितेंद्र सिंह हे मधुमेहाच्या विविध पैलूंवरील आठ पुस्तकांचे आणि तीन मोनोग्रामचे लेखक असल्याचे, मानपत्रात वर्णन केले आहे. वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमाच्या अग्रगण्य पाठ्यपुस्तकांमध्ये,मधुमेहावर त्यांनी लिहिलेल्या प्रकरणांचा समावेश आहे आणि मंत्री होण्यापूर्वी, असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या मानाच्या "एपीआय टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन" च्या सलग बारा आवृत्त्यांमध्ये त्यांनी मधुमेहावर प्रकरणे लिहिली आहेत. डॉ जितेंद्र सिंह यांनी मधुमेहाबाबत जागरुकतेवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी "डायबेटिस मेड इझी" नावाच्या पुस्तकाचा समावेश, नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे झालेल्या जागतिक पुस्तक मेळाव्याच्या उत्तम खप (बेस्ट सेलर) विभागात करण्यात आला आहे.
"काश्मिरी स्थलांतरितांमध्ये ताणतणावामुळे आढळणारा मधुमेह" या विषयावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या महान परिवर्तनात्मक कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कौतुक केले होते. “गर्भधारणेतील मधुमेह व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे” निश्चित करणाऱ्या संशोधकांच्या DIPSY गटाचे ते सदस्य देखील होते. याच मार्गदर्शक तत्त्वांना नंतर संदर्भासाठी म्हणून, WHO ने मान्यता दिली.वैद्यकशास्त्र आणि मधुमेहाचे शिक्षक म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांनी सुमारे दोन डझन(24) विद्यार्थ्यांचे, प्रबंधासाठी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
केंद्र सरकारमधील संसदपटू आणि मंत्री म्हणून डॉ. जितेंद्र सिंह यांच्या योगदानाचा उल्लेखही या मानपत्रात करण्यात आला आहे आणि संसदेतील कामकाजातील उत्कृष्ट सहभाग आणि भाषणांचे देखील कौतुक करण्यात आले आहे. डॉ जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारमध्ये मिळालेली मंत्रालये आणि विभाग यांची प्रभावी हाताळणी केल्याबद्दलही मानपत्रात प्रशंसा करण्यात आली आहे. त्यांचे कठोर परिश्रम, लक्ष्यकेंद्रित दृष्टीकोन आणि निगर्वी- व्यावहारिक स्वभाव समाजातील सर्व वर्गांना भावत होता, असे या मानपत्रात म्हटले आहे. आचार आणि विचार दोन्हीत दिसून येणारा डॉ जितेंद्र सिंह यांचा निगर्वी स्वभाव, तसेच व्यावहारिक आणि मानवी दृष्टिकोन, यामुळे डॉ जितेंद्र सिंह अत्यंत आदरणीय ठरत असून भारताचे "खरेखुरे सुपुत्र" गणले जात आहेत, असे वर्णनही या मानपत्रात करण्यात आले आहे.
उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादापुढे मान झुकवत, भारावून गेलेले डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या आभार दर्शक भाषणात सांगितले की हा पुरस्कार त्यांच्यासाठी खूप मोठा आहे आणि तो केवळ पुरस्कार प्रदानकर्त्यांच्या विनंतीखातर, आपण अत्यंत विनयपूर्वक आणि नम्रतेने स्वीकारत आहोत. सुमारे चार दशकांच्या प्रवासात देशातील काही दिग्गज वैद्यकीय व्यावसायिकांच्या छत्रछायेखाली वाढणे आणि काही नामवंत ज्येष्ठ, तसेच सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला मिळणे हे दैवी वरदान आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले.
***
S.Patil/P.Jambhekar/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038155)
Visitor Counter : 106