निती आयोग
देशात शून्य उत्सर्जन ट्रक वाहनांच्या (झेडईटी) अवलंबित्वाला चालना देता यावी, यासाठी निती आयोगाकडून गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा
Posted On:
14 JUL 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2024
ई - फास्ट इंडिया (e-FAST India - Electric Freight Accelerator for Sustainable Transport – India) अर्थात भारतातील शाश्वत वाहतुकीसाठी माल वाहतुकीच्या भाड्याकरताचे ईलेक्ट्रिक वेगवर्धक या उपक्रमाचा एक भाग म्हणून निती आयोगाने नीती गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा केली आहे. आयआयएम बंगळुरू, स्मार्ट फ्रेट सेंटर इंडिया, कॅलस्टार्ट / ड्राइव्ह टू झिरो आणि जागतिक संसाधन संस्था (WRI - World Resources Institute) यांच्या सहकार्याने निती आयोग हा हॅकेथॉन उपक्रम राबवणार आहे. देशात शून्य उत्सर्जन ट्रक वाहनांच्या (झेडईटी) अवलंबित्वाला चालना देण्याकरता अभिनव व्यवसायिक प्रारूप आकाराला यावे, तसेच यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देता यावी, तसेच या माध्यमातून देशासमोर असलेल्या गंभीर आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करता यावा, हा या हॅकेथॉन उपक्रमाचा उद्देश आहे.
नीती गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमात विद्यार्थी, परिवहन आणि वाहतूक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, या क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक संस्था तसेच संशोधकांनी सहभागी होण्याचे खुले आमंत्रण निती आयोगाने दिले आहे. या सर्वांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी होत माध्यमातून इलेक्ट्रिक ट्रक वाहनांचा वापर करताना येऊ शकणाऱ्या आर्थिक, तांत्रिक आणि कार्यान्वयिन अडचणींचा सामना करण्याकसाठीच्या उपाययोजनांचाही अंतर्भाव असू शकेल, अशा प्रकारचे अभिनव व्यवसायिक पारुप विकसित करावे, असे आवाहनही निती आयोगाने केले आहे. या कार्यक्रमासाठी निती आयोगाला ई-फास्ट इंडिया नॉलेज पार्टनर्स, वित्तीय संस्था तसेच उद्योगजगतातील अनेकांकडून सहभागपूर्ण प्रतिसादही मिळाला आहे.
हा हॅकेथॉन उपक्रम दोन फेऱ्यांमध्ये राबवला जाईल. यातल्या पहिल्या फेरीत, सहभागी झालेले चमू तांत्रिक, कार्यान्वयीन किंवा आर्थिक स्वरुपातील विशिष्ट समस्या घेऊन, त्या समस्यांला अनुसरून आखलेल्या उच्च स्तरीय धोरणे आणि संशोधनात्मक उपाययोजनांचे पाठबळ असलेले प्राथमिक स्तरावरचे व्यावसायिक प्रारूप सादर करतील. यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या फेरीतून निवडलेले चमू, आपल्या आपल्या व्यावसिक प्रारुप तपशीलवार अंमलबजावणीच्या स्वरुपात सादर करतील. यात प्रारुपाच्या अंमलबजावणीचे तपशीलवार स्वरुप, तसेच त्याला प्राथमिक तसेच दुसऱ्या टप्प्यावरील संशोधनाची दिलेली जोड याचा अंतर्भाव असणार आहे. या सर्व प्रारुपांमधील उपाययोजनांना वस्तुनिष्ठ आणि परिणामकारक स्वरुप प्राप्त व्हावे यासाठी, स्पर्धकांना त्यांच्या प्रस्तावांच्या आखणीत या उद्योग क्षेत्रातल्या नामांकित तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.
आपल्या देशातीतल मालवाहतूक क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे देशभरातील 1.4 अब्जांपेक्षा जास्त लोकांपर्यंत मालाचा सुलभतेने पुरवठा करणे शक्य होत आहे. दुसरीकडे भारताच्या वार्षिक डिझेल वापरातील रस्ते माल वाहतुक क्षेत्राच्या वापराचा वाटा हा 55 टक्के इतका असून, त्याचवेळी रस्ते वाहतुकीमुळे होत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनातही रस्ते माल वाहतुकीचा वाटा सुमारे ४० टक्के वाटा इतका आहे. त्यामुळेच या प्रमाणात तातडीने घट साध्य करण्यासाठी अधिकाधिक शाश्वत उपाययोजनांची आखणी आणि अंमलबजावणी करणे ही काळाची गरज झाली आहे. माल वाहतुकीचे विद्युतीकरण हा त्यांपैकीच एक महत्त्वाचा आणि प्राधान्य क्रमावर असलेला उपाय आहे. त्यामागचे कारण हेच की, इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरामुळे आपल्याला कार्बत उत्सर्जनात घट साध्य करण्याची, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याची आणि त्याचवेळी ऊर्जा सुरक्षेत वृद्धी साध्य करत मोठे परिवर्तन घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गिअर शिफ्ट चॅलेंज हा हॅकेथॉन उपक्रम देशातील शाश्वत मालवाहतुकीच्या अग्रेसर वाटचालीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची सर्जनशील प्रतिभा आणि त्यांच्यातील कौशल्याचा सुयोग्य वापर करत, शून्य कार्बन उत्सर्जन ट्रकचा अवलंब करण्याच्या प्रक्रियेला गती देता येईल, आणि त्यामाध्यमातून अर्थव्यवस्था आणि पर्यावरण असा दुहेरी लाभ साध्य करता येऊ शकेल अशा प्रकारच्या व्यवहारिक उपाययोजनांची आखणी करणे हाच या हॅकेथॉन उपक्रमाचा उद्देश आहे.
या हॅकेथॉन उपक्रमाबद्दलच्या अधिक माहितीसाठी आणि गिअरशिफ्ट चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी, कृपया भेट द्या: NITI GearShift Challenge
* * *
S.Nilkanth/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033132)
Visitor Counter : 78