कोळसा मंत्रालय
फ्लाय अॅशचा पुनर्वापर आणि विल्हेवाट यासाठी कोळसा मंत्रालयाच्या सक्रिय उपाययोजना
फ्लाय अॅशच्या विल्हेवाटीसाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना 19 कोळसा खाणींचे वाटप
Posted On:
09 JUL 2024 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2024
औष्णिक ऊर्जा प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या फ्लाय अॅशचा पुनर्वापर आणि विल्हेवाट योग्य प्रकारे व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय, सक्रियपणे काम करत आहे. कोळशावर आधारित वीजनिर्मितीच्या या उपउत्पादनाची विल्हेवाट लावून मंत्रालय, पर्यावरणीय कल्याणाला प्राधान्य आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देत शाश्वत भविष्यकडे वाटचाल करत आहे.
कोळशाच्या ज्वलनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी, कोळसा मंत्रालय फ्लाय अॅशची योग्य विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन देते. व्यापक संशोधन आणि विकासामुळे खाणीतल्या मोकळ्या जागा भरण्यासाठी आणि बांधकाम साहित्याचा एक घटक म्हणून फ्लाय अॅशचा प्रभावी वापर करणे शक्य झाले आहे. यामुळे पर्यावरणावरचा दुष्परिणाम कमी होण्यासोबत शाश्वत विकास पद्धतींना देखील पाठबळ मिळते.
(Fly Ash filling at old Abandoned Quarry of Manikpur OC, Korba Area)
फ्लाय अॅशची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी खाणीतील मोकळ्या जागांचे वाटप करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल कोळसा मंत्रालयाने उचलले आहे. यासाठी 2023 मध्ये कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय स्तरावरील कार्यकारी गट स्थापन करण्यात आला. इच्छुक औष्णिक ऊर्जा प्रकल्प खाणींमधल्या रिक्त जागांसाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे आवेदन करतात. त्यावर केंद्रीय स्तरावरील कार्यकारी गटात चर्चा होते. याअंतर्गत एकूण 19 खाणी 13 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना देण्यात आल्या आहेत. या वाटपातून फ्लाय अॅशशी संबंधित पर्यावरणीय चिंतेवर मार्ग निघत असून कोळसा खाण क्षेत्रात शाश्वत पद्धतींना चालना मिळत आहे. आतापर्यंत गोरबी कोळसा खाण खड्डा -1 येथे अंदाजे 20.39 लाख टन फ्लाय अॅशचा पुनर्वापर करण्यात आला आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या 3 नोव्हेंबर 2009 च्या अधिसूचनेनुसार, "फ्लाय अॅश" या शब्दाचा अर्थ आणि त्यात समाविष्ट होणारी सर्व राख, जसे की इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसिपिटेटर राख, ड्राय फ्लाय अॅश, बॉटम अॅश, पॉण्ड अॅश आणि माऊंड अॅश.
Fly Ash filling in Gorbi Mine (Pit-1), NCL
कार्यरत खाणींमध्ये फ्लाय अॅश मिसळण्याच्या इष्टतम पद्धतींचा शोध घेण्यासाठी सर्वसमावेशक व्यवहार्यता अभ्यास केला जात आहे. फ्लाय ॲशच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वापरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सुरक्षा आणि प्रशासकीय दोन्ही बाबी लक्षात घेऊनमानक कार्यप्रणाली स्थापित करण्यात आल्या आहेत.
कोळसा मंत्रालय फ्लाय ॲशची सुरक्षित हाताळणी आणि व्यवस्थापन सुनिश्चित करत, जड धातू आणि सूक्ष्म कण उत्सर्जनाशी संबंधित संभाव्य पर्यावरणीय चिंतांवर उपाय योजते. देशाचे स्वच्छ आणि हरित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय नवोन्मेषाची कास धरत शाश्वत पद्धतींचे कार्यान्वयन सुरू ठेवेल.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031938)
Visitor Counter : 102