संरक्षण मंत्रालय

द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अबू धाबी येथे 12 वी संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक

Posted On: 09 JUL 2024 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

भारत आणि यूएई (संयुक्त अरब अमिराती) यांच्यात  9 जुलै 2024 रोजी अबू धाबी येथे 12 वी संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक झाली. दोन्ही देशांमधले संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सहयोगाच्या व्यापक  संधींवर  या बैठकीत दोन्ही बाजूंनी चर्चा केली. प्रशिक्षण, संयुक्त लष्करी सराव, संरक्षण औद्योगिक सहकार्य, विषय तज्ञांमधले ज्ञानाचे आदानप्रदान, संशोधन आणि विकास इत्यादीबाबत  सविस्तर चर्चा झाली.

दोन्ही देशांनी  सागरी सुरक्षेसह क्षेत्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज अधोरेखित केली. विविध क्षेत्रात एकमेकांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी परस्पर भेटीसंबंधातही चर्चा झाली. प्रमुख क्षेत्रात प्रशिक्षणाच्या संधींचे  परस्पर आदानप्रदान  करण्यावरही सहमती झाली.

भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी केले. या प्रतिनिधीमंडळात संरक्षण मंत्रालय, सशस्त्र दल आणि अबू धाबीतल्या भारतीय दूतावासातले वरिष्ठ अधिकारी होते. बैठकीचे सह अध्यक्षस्थान संयुक्त अरब अमिरातीचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ जमाल इब्राहिम मोहम्मद अल्माझरूकी यांनी भूषवले. 

या भेटीदरम्यान, संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांनी यूएईच्या संरक्षण मंत्रालयाचे सहाय्यक अवर सचिव अली अब्दुल्ला अल अहमद यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर चर्चा केली.  तवाझून आर्थिक परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतची त्यांची भेटही यशस्वी ठरली. संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या नौदल आणि लष्करकर्मींमध्येही बोलणी  झाली. 

भारत-यूएई संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची स्थापना 2006 मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत 11 फेऱ्या झाल्या आहेत. 12 व्या बैठकीने भारताचे यूएईसोबतचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध आणखी मजबूत करण्याची संधी पुरवली  आणि दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला बळकटी दिली.

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031936) Visitor Counter : 35