विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

प्रत्येक तिसऱ्या भारतीयामध्ये मेदयुक्त यकृत आढळत असून हे मधुमेह आणि चयापचयाशी संबंधित विकारांना कारणीभूत लक्षण असल्याचे  डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


चयापचयाशी संबंधित यकृताचे आजार टाळण्यासाठी आणि बरे करण्यासाठीच्या इंडो-फ्रेंच लिव्हर अँड मेटाबॉलिक डिसीज नेटवर्क (InFLiMeN) या आभासी केंद्राचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन

Posted On: 05 JUL 2024 2:00PM by PIB Mumbai

 

प्रत्येक तिसऱ्या भारतीयामध्ये फॅटी लिव्हर(मेदयुक्त यकृत ) आढळत असून हे   टाइप 2 मधुमेह आणि इतर चयापचय विकारांना कारणीभूत लक्षण असल्याचे  प्रतिपादन राष्ट्रीय ख्यातीचे मधुमेहतज्ज्ञ केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते चयापचयाशी संबंधित यकृताचे आजार टाळण्यासाठी आणि बरे करण्यासाठीच्या इंडो-फ्रेंच लिव्हर अँड मेटाबॉलिक डिसीज नेटवर्क (InFLiMeN) या आभासी केंद्राचे आज नवी दिल्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस(यकृत तसेच पित्त विज्ञान संस्था ) येथे उदघाटन झाले.

सिरोसिस आणि प्राथमिक यकृत कर्करोगात पर्यवसन होणाऱ्या सामान्य चयापचय संबंधित यकृत विकार, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांशी (NAFLD) संबंधित मुख्य समस्यांचे निराकरण करणे हे इंडो-फ्रेंच नोड, InFLiMeN चे उद्दिष्ट आहे असे उदघाटनपर भाषणात डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. मेदयुक्त यकृत  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरते. एंडोक्रिनोलॉजिस्ट म्हणून, मेदयुक्त यकृताशी संबंधित बाबींचे  बारकावे आणि त्याचा मधुमेह आणि इतर चयापचय विकारांशी संबंध आपण जाणत असल्याचे त्यांनी नमूद केले.

"भारतीय उपखंड आणि युरोप या  दोन्ही ठिकाणी  जीवनशैली, आहारमधुमेह आणि लठ्ठपणा यांसारखे  चयापचय विकार यामुळे  NAFLD मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे" हे निदर्शनास आणताना सुमारे 3 पैकी 1 भारतीयाला  फॅटी लिव्हरचा विकार असल्याकडे  डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले. पाश्चिमात्य देशांमध्ये, बहुतेक NAFLD हे लठ्ठपणाशी संबंधित आहेत, विशेष म्हणजे भारतीय उपखंडात, NAFLD हे स्थूल नसलेल्या सुमारे 20% रुग्णांमध्ये दिसून येतात.

फॅटी लिव्हरच्या विविध अवस्था आणि यकृताचे  गंभीर अथवा पूर्णपणे निकामी होण्याचे स्वरूप ओळखण्यासाठी सोप्या, कमी किमतीच्या निदान चाचण्या विकसित करण्याची तातडीची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले.

या निदान चाचण्यांचा दृष्टीकोन आणि पद्धत ही भारतीय संदर्भानुसार, वाजवी असावी असे मत त्यांनी मांडले.

डॉ. शिवकुमार सरीन आणि फ्रेंच सहकाऱ्यांसह त्यांच्या चमूचे सिंह यांनी  अभिनंदन केले.  चयापचयाशी संबंधित विकारांवर कमी खर्चात आणि उच्च परिणाम पद्धतीने उपाय शोधण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या केंद्रात 11 फ्रेंच आणि 17 भारतीय डॉक्टर संयुक्तपणे काम करतात.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031005) Visitor Counter : 16