इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दोन दिवसीय जागतिक इंडियाएआय शिखर परिषद 2024चा नवी दिल्लीत प्रारंभ
Posted On:
03 JUL 2024 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2024
जागतिक इंडियाएआय शिखर परिषद 2024चा आज नवी दिल्लीत भारत मंडपममध्ये प्रारंभ झाला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, जपानचे गृह आणि दळणवळण खात्याचे उपमंत्री हिरोशी योशिदा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद, सचिव एस कृष्णन, नॅसकॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष, ओपनएआयचे उपाध्यक्ष श्रीनिवास नारायणन् आणि मेतीचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात कृत्रिम प्रज्ञाविषयक जागतिक भागीदारी (GPAI) तज्ञ, प्रतिनिधी, उद्योग आणि स्टार्टअपमधील दिग्गज, एआय व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी आणि केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना अश्विनी वैष्णव यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचे लोकशाहीकरण करण्याचा आणि कोणालाही मागे न ठेवता ते सर्वांना उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा हेतू आणि दृष्टीकोनावर भर दिला. एआयचा भर असलेले नेहमीच्या वापरातील सार्वजनिक मंच ज्यांचा वापर सर्वांना नवोन्मेषासाठी, उत्पादने आणि सेवांची निर्मिती आणि वितरण स्पर्धात्मक आणि सहकार्यकारक पद्धतीने करण्यासाठी करता येईल, अशा मंचात गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जपान, युरोपीय संघ, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र यांनी एआय अवकाशात केलेल्या विकासाकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी एआयमुळे, निर्माण झालेल्या जोखमींबाबत ज्या लोकशाही समुदायांना धोका निर्माण करू शकतात,त्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आणि त्याचा जबाबदारीने आणि मानवकेंद्रित वापर करण्याचे आवाहन केले.
हिरोशी योशिदा यांनी भारत सरकारची प्रशंसा करून म्हटले की, जीपीएआय (GPAI) चे आयोजन, भारताची जबाबदार कृत्रिम बुद्धीमत्ते (एआय) प्रति दृढ वचनबद्धता दर्शवते. ग्लोबल साउथमधील जीपीएआय चे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताला पाठिंबा दिला. जपानने जीपीएआय चे टोकियो केंद्र स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. होरीश्मा एआय प्रोसेस फ्रेंड्स ग्रुपमधील सदस्य देशांची संख्या 53 वर पोहोचली असून, भारत हा त्यामध्ये सहभागी होणार्या पहिल्या काही देशांमध्ये असल्याचे ते म्हणाले.
जितिन प्रसाद यांनी सांगितले की भारत जागतिक एआय नवोन्मेषामध्ये आघाडीवर आहे. सर्वसमावेशक आणि मजबूत एआय परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता आहे. भारतात एआयची निर्मिती करणे आणि भारतासाठी एआय ने काम करणे हा INDIAai मिशनचा दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला. एस कृष्णन यांनी सांगितले की लोकसंख्येच्या प्रमाणात एआय स्वीकारण्यासाठी बहु-भागधारक दृष्टीकोन आवश्यक आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एआय ही प्रमुख आधारशीला ठरेल, यावर त्यांनी भर दिला.
एआय वर जागतिक शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल श्रीनिवास नारायणन यांनी भारत सरकारचे आभार मानले, आणि सांगितले की OpenAI, INDIAai बरोबर भागीदारी करू इच्छितो आणि मूल्यवर्धनात योगदान देऊ इच्छितो. देबजानी घोष यांनी आशा व्यक्त केली की, INDIAai खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होऊन आणि मानवाला एआय च्या नियंत्रणाखाली न ठेवता, एआयला मानवाच्या नियंत्रणात ठेवून, एआय साठी सुवर्ण मानक स्थापित करेल.
उद्घाटन समारंभानंतर आज एआयवरील सहा सत्रे आयोजित करण्यात आली होती.
दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे:
https://www.youtube.com/@DigitalIndiaofficial/streams
* * *
S.Kane/ShaileshP/Rajashree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030553)
Visitor Counter : 90