संरक्षण मंत्रालय
भारत - थायलंड यांच्यातील संयुक्त लष्करी सराव मैत्री मध्ये भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य दल रवाना
Posted On:
02 JUL 2024 10:32AM by PIB Mumbai
संयुक्त लष्करी सराव मैत्री च्या 13व्या सत्रात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य दल काल रवाना झाले. हा संयुक्त लष्करी सराव थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन फोर्ट येथे 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या आधी सप्टेंबर 2019 मध्ये मेघालय मधील उमरोई येथे अशाप्रकाचा संयुक्त सराव झाला होता.
भारतीय सैन्य दलात एकूण 76 सैनिकांचा समावेश असून त्यामध्ये मुख्यत्वे लडाख स्काउट्सच्या तुकडीचे जवान आणि इतर संरक्षण दले आणि सेवांमधील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. रॉयल थायलंड सैन्यदलामध्ये प्रामुख्याने पहिल्या तुकडीतील चौथ्या डिव्हिजनच्या 14 इन्फंट्री रेजिमेंट मधील 76 जवानांचा समावेश आहे.
भारत आणि थायलंड यांच्यात लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचे मैत्री या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी पर्यावरणातील घुसखोरी / दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची क्षमतावृद्धी होईल. या सरावामध्ये उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त व्यवस्थापन आणि संयुक्तपणे विविध सामरिक कवायतींचा समावेश असेल.
या सरावादरम्यान होणाऱ्या सामरिक कवायतींमध्ये संयुक्त परिचालन केंद्राची निर्मिती, गुप्तचर आणि देखरेख केंद्राची स्थापना, ड्रोनचा वापर आणि ड्रोन विरोधी यंत्रणा, लँडिंग साठी जागेची निश्चिती, लहान तुकडी रणनीती आणि एक्सट्रॅक्शन, स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स, घेराबंदी आणि शोध मोहीम, रूम इंटरव्हेंशन ड्रिल्स आणि बेकायदेशीर बांधकामे नष्ट करणे यांचा समावेश असेल.
मैत्री सराव, दोन्ही देशांच्या लष्कराला त्यांच्या संयुक्त कारवाईसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता, सौहार्द आणि सद्भाव वाढवण्यास मदत होईल.
***
NM/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030188)
Visitor Counter : 253