माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकुलात भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्या चित्रपट महोत्सवाला सुरूवात, इंडोनेशियन चित्रपट केंद्रस्थानी

Posted On: 01 JUL 2024 10:16PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जुलै 2024

 

इंडोनेशिया आणि भारतीय चित्रपट विकास महामंडळाचा  संयुक्त चित्रपट महोत्सव आजपासून मुंबईतील राष्ट्रीय  चित्रपट संग्रहालयाच्या संकुलात सुरू झाला.  भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्या या महोत्सवाचे हे तिसरे पर्व असून, हा सहा दिवसीय महोत्सव येत्या 6 जुलै 2024 पर्यंत चालणार आहे. महत्वाचे म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून या महोत्सवात इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणली जाते.

आज या महोत्सवाचा शानदार उद्घाटन समारंभ झाला. अक्षत अजय शर्मा हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून तसेच महोत्सवाच्या फलकाचे अनावरण करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. अक्षत अजय शर्मा हे 'मेजर' (2022), 'राधे श्याम' (2022), 'एके व्हर्सेस एके' (2020) या चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'हड्डी' या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.

या उद्घाटन समारंभानंतर 'पार्टिकेलीर' या इंडोनेशियायी चित्रपटाचा खेळ दाखवून, महोत्सवाच्या आगामी दिवसांच्या रोमांचक वाटचालीची मुहुर्तमेढ रोवली गेली.

इंडोनेशियाचे महावाणिज्यदूत एडी वारदोयो हे देखील या समारंभाला उपस्थित होते. इंडोनेशियन चित्रपटाचा खेळ मुंबईारख्या ठिकाणी दाखवला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या भाषणातून एडी वारदोयो यांनी इंडोनेशियन चित्रपटांमधील कथात्मक मांडणीची समृद्ध परंपरा आणि इंडोनेशियातील चित्रपटांमधील अद्वितीय सांस्कृतिक कथानंकाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. भारत आणि इंडोनेशियातील चित्रपटांमधील कथांच्या संकल्पना प्रामुख्याने कुटुंब आणि परंपरा या संकल्पनांभोवती रचलेल्या असतात, त्यामुळे इंडोनेशियन  चित्रपट देखील भारतीय प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुंजी घालतात असे ते म्हणाले. भारतीय चित्रपट विकास महामंडळ आणि इंडोनेशियन  चित्रपट दिग्दर्शकांमधील धोरणात्मक सहकार्यामुळे परस्परांमधील हे सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागतिक मान्यता मिळविण्यात इंडोनेशियन  चित्रपट दिग्दर्शकांसमोर असलेल्या आव्हानांविषयीची जाणिव त्यांनी उपस्थितांना करून दिली.  भारतीय चित्रपट विकास महामंडळासारख्या संस्थांसोबतच्या भागीदारीमुळे, व्यापक आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी गरजेचं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतील, त्यातून या चित्रपटांमागे पाठबळ उभे राहील, आणि या सगळ्याची समोर असलेल्या आव्हानांवर मात करण्यात मदत होईल  अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. अशा प्रकारच्या परस्पर सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील चित्रपट उद्योग क्षेत्रांची  भरभराट होऊ शकेल, आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कलात्मक अभिनवतेच्या नवीन संधी निर्माण होऊ शकताील असे ते म्हणाले.

महोत्सवाचे वेळापत्रक :

या महोत्सवात इंडोनेशियन आणि भारतीय चित्रपटांचा उत्कंठावर्धक मिलाफ अनुभवास येतो. महोत्सवातील चित्रपटांचे वेळापत्रक पुढे दिले आहे:

  • 1 जुलै : पार्टिकेलिर (इंडोनेशियन  चित्रपट)
  • 2 1 जुलै : कांतारा
  • 3 जुलै : सेहिदुप सेमाती (इंडोनेशियन  चित्रपट)
  • 4 जुलै : मेजर 
  • 5 जुलै : सेक टोको सेबेलाह (इंडोनेशियन  चित्रपट)
  • 6 जुलै : आर आर आर

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030134) Visitor Counter : 22


Read this release in: English