विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देशभरातील विविध विषयातील निष्णात वैद्यकीय व्यावसायिकांना "टाइम्स नाऊ" डॉक्टर पुरस्कार प्रदान
Posted On:
29 JUN 2024 4:51PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तसेच अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होऊन, देशभरातील विविध विषयातील निष्णात वैद्यकीय व्यावसायिकांना "टाइम्स नाऊ" डॉक्टर पुरस्कार प्रदान केले. डॉक्टर्स डे च्या पूर्वसंध्येला, ‘टाइम्स नाऊ’ माध्यम समूहातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बोलताना तसेच नंतर "टाईम्स नाऊ" सोबतच्या विशेष संवादात डॉ. जितेंद्र सिंह यांनी, तरुण वर्गासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर दिला. उतार वयात होणाऱ्या टाईप 2 मधुमेह यासारख्या विकारांचा युवा वर्गाला होणार त्रास, युवा वयोगटात हृदयविकाराचा झटका येण्याचे वाढते प्रमाण, ही केवळ आरोग्यासमोरील आव्हाने नाहीत, तर राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देणाऱ्या आणि विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या युवाशक्ती आणि युवा क्षमतेला नष्ट करणारे धोके आहेत, असेही ते म्हणाले.
स्वतः मेडिसीन आणि एंडोक्राइनोलॉजीचे प्राध्यापक असणारे डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांचे शिक्षक, बी सी रॉय पुरस्कार विजेते, प्राध्यापक डॉ. व्ही. शेषय्या यांची भेट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. व्ही. शेषय्या हे चेन्नईतील मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झालेल्या भारतातील पहिल्या-वहिल्या मधुमेहशास्त्र विभागाचे संस्थापक-प्रमुख आहेत. डॉ. व्ही. शेषय्या यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. डॉक्टरांच्या तीन पिढ्यांना एकाच छताखाली एकत्र आणल्याबद्दल डॉ. सिंह यांनी आयोजकांचे कौतुकही केले. केंद्रीय मंत्र्यांनी ‘लिजेंड्स ऑफ मेडिसिन’ श्रेणीतील डॉक्टरांचा सत्कारही केला.
वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासावर बोलताना मंत्र्यांनी 2024 मधील संख्येच्या तुलनेत 2014 पूर्वी एम्स च्या संख्येचे स्मरण केले.
आरोग्य सेवा क्षेत्राने स्वतःला ॲलोपॅथिक औषधांपुरते मर्यादित न ठेवता आयुष आणि इतर प्रणालींचा सर्वसमावेशकपणे वापर केला पाहिजे, असेही ते म्हणाले. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी उत्तम कामाची परिस्थिती, सतत शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2029549)
Visitor Counter : 81