संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाने परिसंवाद आयोजित करून तिसऱ्या युद्ध आणि अवकाश धोरण कार्यक्रमाचा (वास्प) केला समारोप

Posted On: 25 JUN 2024 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

भारतीय हवाई दलाने आज नवी दिल्ली येथील वायुसेना सभागृहात तिसऱ्या युद्ध आणि अवकाश धोरण कार्यक्रमाचा (वॉरफेअर अँड एरोस्पेस स्ट्रॅटेजी प्रोग्राम -वास्प) समारोप परिसंवादाने केला. कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या वतीने "भारताची धोरणात्मक संस्कृती आणि समकालीन राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यकता" या विषयावर हा परिसंवाद झाला.

वास्प  हा 15 आठवडे कालावधीचा धोरणात्मक शिक्षण कार्यक्रम आहे. याची सुरूवात 2022 मध्ये झाली. भू-राजकारण, भव्य रणनीती आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्तीची सखोल माहिती देण्यासाठी  हा कार्यक्रम सुरू झाला. धोरणात्मक स्तरावर धोरणाला चालना देणाऱ्या कल्पना निर्माण करण्यासाठी आंतर विद्याशाखीय ज्ञान असलेल्या विचारवंतांच्या विचारांची मशागत करणे हे त्याचे व्यापक उद्दिष्ट आहे.

वास्पच्या यंदाच्या आवृत्तीत प्रथमच लष्कराच्या तीनही सेवांचा सहभाग दिसून आला. सहभागींमध्ये भारतीय हवाई दलातील चौदा अधिकारी, भारतीय नौदलाचे दोन अधिकारी, भारतीय लष्करातील एक अधिकारी आणि एक संशोधन अभ्यासक यांचा समावेश होता. सहभागींनी रणनीती, लष्करी इतिहास, नागरी-लष्करी संबंध, उच्च संरक्षण संघटना, एरोस्पेस पॉवर, माहिती युद्ध, तंत्रज्ञान आणि संकरित युद्ध या क्षेत्रांमध्ये सखोल प्रशिक्षण घेतले. व्यापक अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव असलेल्या बाह्य विद्याशाखेतील निपुण अभ्यासक-विद्वानांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी पदवीधरांना राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाकडून धोरणात्मक अभ्यास या विषयातील पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली.

   

हवाई दलाचे प्रमुख (सीएएस) एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी बीजभाषण केले. यावेळी संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, तिन्ही सेवेतील सर्व वरिष्ठ अधिकारी, एरोस्पेस पॉवर अभ्यासक, शैक्षणिक आणि प्रस्थापित संरक्षण वार्ताहर उपस्थित होते. आधुनिक युद्धाच्या गतिशील वातावरणामुळे लष्करी नेत्यांना केवळ लढाईतच पारंगत होऊन चालणार नाही तर त्यांच्याकडे धोरणात्मक विचार करण्याची क्षमता आणि विकसित होणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीचे भान असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अवघड कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल चौधरी यांनी सहभागींचे अभिनंदन केले. मार्गदर्शकांचे कौतुक केले आणि वास्पच्या आगामी आवृत्त्यांमध्येही त्याच उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन भाषणाचा समारोप करताना चौधरी यांनी केले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028667) Visitor Counter : 61