संरक्षण मंत्रालय

दोन दिवसांच्या भेटीनंतर भारतीय नौदलाचे आयएनएस सुनयना हे जहाज पोर्ट लुईस बंदरावरून रवाना

Posted On: 24 JUN 2024 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2024

 

भारतीय नौदलाच्या आयएनएस सुनयना या जहाजाच्या मॉरिशस इथल्या पोर्ट लुईस या बंदर भेटीची 22 जून 24 रोजी सांगता झाली.  हे जहाज दोन दिवसांच्या पोर्ट लुईस भेटीवर गेले होते. या दोन दिवसीय दौऱ्याच्या काळात भारतीय नौदल आणि मॉरिशस राष्ट्रीय तटरक्षक दलाचे जवान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या संयुक्त योगाभ्यास सत्र तसेच विविध क्रिडाविषयक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान आयएनएस सुनयना या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कमांडर प्रभात रंजन मिश्रा यांनी मॉरिशसमधल्या भारताच्या उच्चायुक्त के. नंदिनी सिंगला आणि मॉरिशस पोलीस दलाचे आयुक्त आयुक्त अनिल के. दीप यांची भेट घेतली. या भेटीत सागरी सुरक्षेच्या विविध पैलूच्या कार्यान्वयनातील सहभागाशी संबंधित तसेच परस्पर विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत करण्याच्या उपाययोजनांवर व्यापक चर्चा झाली. आपल्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान आयएनएस सुनयना जहाजाने मॉरिशस तटरक्षक दलासोबत मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामन्यात भाग घेतला. यावेळी पोर्ट लुईस इथल्या गयासिंग आश्रमात सामाजिक सहकार्याच्या उद्देशाने झालेल्या कार्यक्रमात वृद्धांची वैद्यकीय तपासणी केली गेली तसेच आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे जहाज अभ्यागतांसाठी खुले ठेवले गेले होते. जहाजाच्या वास्तव्यादरम्यान 200 पेक्षा जास्त पाहुण्यांनी जहाजाला भेट दिली. या पाहुण्यांना जहाजाची क्षमता आणि जहाजाच्या मूलभूत माहितीसह  मार्गदर्शन केले गेले.

पोर्ट लुईसची भेट आटोपून तिथून प्रस्थान केल्यानंतर आयएनएस सुनयना जहाज मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या संयुक्त देखरेखीच्या पुढच्या टप्प्यासाठी रवाना झाले. यावेळी मॉरिशच्या सागरी तटरक्षक दलाचे जवान प्रशिक्षण देवाण - घेवाणीसाठी  या जहाजासोबत रवाना झाले. आयएनएस सुनयना या जहाजाच्या मॉरिशस दौऱ्यामुळे  सागरी किनारा लाभलेल्या या दोन्ही देशांमधील मैत्री आणि परस्पर संबंधांनी अधिक दृढ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028351) Visitor Counter : 29