माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जपानचे मुख्य उपमहावाणिज्यदूत यांनी सांस्कृतिक बंध अधिक दृढ करण्यावर दिला भर
“भारत-जपान संबंधांमध्ये मुंबईला ऐतिहासिक महत्त्व आहे”: जपानचे मुख्य उपमहावाणिज्यदूत
Posted On:
20 JUN 2024 10:40PM by PIB Mumbai
मुंबई, 20 जून 2024
“भारत-जपान संबंधात मुंबईला विशेष स्थान आहे. मुंबईत या सगळ्याची सुरुवात झाली आहे. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जपानचे मुंबईतील मुख्य उप महावाणिज्यदूत तोशिहिरो कानेको यांनी जपान आणि मुंबई यांच्यातील संबंध अधोरेखित केले. ते आज मिफ्फ 2024 मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
जपान-भारत संबंधांसाठी मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन, मुंबईतील जपानचे मुख्य उप महावाणिज्यदूत, तोशिहिरो कानेको यांनी 19व्या शतकातील चिरकालीन सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर भर दिला. याची सुरुवात कापसाच्या व्यापारापासून झाली आणि आज हाय-स्पीड रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या गतिशील भागीदारीत रूपांतर झाले आहे. दक्षिण मुंबईत 3000 हून अधिक जपानी रहिवासी वास्तव्य करत असल्याचे कानेको यांनी अधोरेखित केले , जो दोन देशांना अनेक वर्षांपासून जोडलेल्या दीर्घकालीन नौवहन व्यापार मार्गांचा दाखला आहे.
एनएफडीसी सोबत दशकभराची भागीदारी असून महोत्सवात जपानी सिनेमाचा गहन प्रभाव जाणवत असल्याचे मुख्य उप महावाणिज्यदूत यांनी अधोरेखित केले. यावर्षी,आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 'जपानी चित्रपट' विभाग, विशेष स्क्रीनिंग पॅकेज आणि मोझॅक यांसारख्या विविध श्रेणींमध्ये 11 जपानी चित्रपट असून पारंपारिक जपानी कला आणि समकालीन कथाकथन तंत्रांची जोड यामुळे ते प्रेक्षकांना मोहित करतात.
त्यांनी जपान आणि भारत यांच्यातील चैतन्यशील सांस्कृतिक देवाणघेवाण अधोरेखित केली आणि कलात्मक सहकार्याला चालना देण्यासाठी आणि सिनेमा आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे भारत-जपान बंध मजबूत करण्यासाठी जपान कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
जपानमधील चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जपानच्या चित्रपट आयोगाच्या भरीव अनुदानावर त्यांनी भर दिला आणि पसंतीचे चित्रीकरण स्थळ म्हणून देशाचे आवाहन अधिक मजबूत केले.
भरभराट होत असलेल्या ॲनिमेशन क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले, "ॲनिमेशनच्या क्षेत्रात, काबुकी थिएटर तंत्रासारख्या पारंपारिक जपानी संस्कृतीचे मिश्रण आपण पाहतो, जे समकालीन चित्रपटांच्या दृश्य कथांना अधिक समृद्ध करते. ही सांस्कृतिक देवघेव केवळ कलात्मक अभिव्यक्ती वृद्धिंगत करत नाही तर आपल्या राष्ट्रांमधील बंध देखील बळकट करते."
जपानच्या तांत्रिक सामर्थ्यावर भर देत , कानेको यांनी शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्याचा प्रस्ताव मांडला तसेच जपानी तंत्रज्ञांना विशेष कौशल्ये प्रदान करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसोबत सहकार्य करण्याचे समर्थन केले. भारताच्या चित्रपट उद्योगाला पुढे नेण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील हे त्यांनी अधोरेखित केले.
"हिंदू, बौद्ध आणि शिंटोइझममधील पारंपारिक समजुतींपासून ते योगासारख्या समकालीन आवडींपर्यंत, आपले देश समान धागा शोधत आहेत आणि एकमेकांची सांस्कृतिक वीण समृद्ध करत आहेत," असे कानेको म्हणाले.
कानेको यांनी भविष्यातील सहकार्याबद्दल आशावाद व्यक्त केला तसेच चित्रपट निर्मात्यांना सह-निर्मिती संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले. त्यांनी निर्मिती अनुभव सुलभ करण्यासाठी जपानच्या राज्य-निहाय चित्रपट कमिशनचा लाभ घेण्यास प्रोत्साहन दिले.
सिनेमॅटिक योगदानाव्यतिरिक्त, जपान राष्ट्रीय पर्यटन संघटना (JNTO) आणि ऑल निप्पॉन एअरवेज (ANA) यांच्या सहकार्याने पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या निमित्ताने झाला.
18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा चित्रपटाचा आनंद घेण्याचे एक निर्णायक व्यासपीठ म्हणून काम करत असतानाच सीमेपलिकडील दृढ संबंध जोपासत आहे.
* * *
PIB Team MIFF | S.Kakade/S.Kane/D.Rane | 58
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027318)
Visitor Counter : 40