माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18व्या मिफ्फ ने "व्यक्तिरेखाना आकार " देण्याचे आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे कसब सर्वांसमोर आणले
“संकलन म्हणजे प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह किंवा अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण करणे”: मास्टर एडिटर ओली हडलस्टन
Posted On:
20 JUN 2024 10:20PM by PIB Mumbai
मुंबई, 20 जून 2024
“संकलक म्हणून तुम्हाला कथानक उमजण्याची गरज आहे, व्यक्तिरेखा भावण्याची आवश्यकता आहे – मग ते काल्पनिक असो किंवा माहितीपट असो,” असे मत दूरचित्रवाणी आणि सिनेमा माहितीपटांचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले पुरस्कार विजेते चित्रपट संकलक ओली हडलस्टन यांनी व्यक्त केले. मुंबईत 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) समारोपाच्या पूर्व संध्येला आयोजित त्यांच्या मास्टर-क्लासमध्ये ते विचार मांडत होते. ‘शेपिंग कॅरेक्टर्स’ या शीर्षकाच्या आजच्या संकलन मास्टर-क्लासमध्ये ओली हडलस्टन यांनी चित्रपट साकारताना कथाकाराच्या दृष्टिकोनावर भर दिला.
संकलनाद्वारे आकर्षक व्यक्तिरेखा साकारण्याचे त्यांचे कौशल्य उलगडण्यासाठी मास्टर एडिटरने प्रदर्शनासाठी त्यांच्या पुरस्कारप्राप्त माहितीपट 'ड्रीम कॅचर' ची निवड केली. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा हा माहितीपट मरणाच्या संकटातून बचावलेल्या ब्रेंडा मायर्स-पॉवेलच्या नजरेतून आपल्याला एका अनोळखी जगात घेऊन जातो. शिकागोच्या रस्त्यावर आधी किशोरवयात वेश्येचे जीवन जगणारी ब्रेंडा अवहेलना झेलत तिच्या समुदायात बदल घडवून आणण्यासाठी एक उत्तम वकील बनली. कळकळ आणि आत्मीयतेने ब्रेंडा ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांना दिलासा देते. तिची कथा ही त्यांची प्रेरणा आहे. शिकागोच्या ब्रेंडाच्या उल्लेखनीय कथेद्वारे, दिग्दर्शक किम लाँगिनोटो यांनी दरवर्षी वेश्याव्यवसाय हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव पर्याय आहे असे वाटणाऱ्या हजारो मुली आणि महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष, हिंसा आणि शोषणाच्या चक्राचा धांडोळा घेतला आहे.
माहितीपटातील अनेक दृश्ये दाखवत ब्रेंडाच्या व्यक्तिरेखेला पडद्यावर जिवंत करणाऱ्या त्यांच्या कामाबद्दल लोकांना अवगत करताना मास्टर एडिटर ऑली हडलस्टन म्हणाले, "जेव्हा लोक तुम्हाला ब्रेंडा सारख्या आकर्षक कथा सांगतात, तेव्हा संकलन हा एक भावनिक अनुभव बनतो." त्यांच्यासाठी, माहितीपटांमधील कथानक म्हणजे लोकांसोबत काय घडते आणि ते त्यावर मात करून कसे जगतात हे दाखवणे होय. संकलकाने चित्रपटाचे कथानक कथाकाराच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. “तुम्हाला कथेचा गाभा प्रेक्षकांना उलगडून दाखवावा लागेल,” प्रेक्षकांना व्यक्तिरेखेकडे आकर्षित करण्यासाठी संकलन योग्यरित्या करावे लागते असेही त्यांनी नमूद केले.
संगीत आणि प्रतिमांनी मूळ कथानकाला वेगळे वळण लागू नये असे त्यांना मनापासून वाटते. कथा कथन करण्यासाठी माहितीपटांमध्ये सबटायटल्स देखील वापरले जाऊ शकतात. संकलनाद्वारे व्यक्तिरेखेचे कंगोरे उलगडता येतात, असेही ते म्हणाले. "संकलनाचे कोणतेही सूत्र नसते, व्यक्तिरेखेचे विविध पैलू दाखवण्याचा हा एक प्रवास असतो." त्यांना वैयक्तिक कथांवर काम करायला आवडते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिग्दर्शक, किम लाँगिनोटो यांनी कथेतील पात्रांसह शिकागोमध्ये दोन महिने घालवले होते, परंतु ओली त्यांना भेटले नव्हते. या संदर्भात, ते म्हणाले की चित्रपट निर्मितीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे आणि संकलकाचे काम म्हणजे सर्व चित्रीकरण पाहून त्यावर शांतपणे स्वतःची मते नोंदवून ठेवणे आणि नंतर चित्रपटाद्वारे त्याचा/तिचा मार्ग अनुभवणे. एक चांगला माहितीपट बनवण्यासाठी तुम्हाला निरीक्षणात्मक चित्रपट बनवण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
ओली हडलस्टन म्हणाले की ब्रेंडाने स्वतः हा चित्रपट पाहिला आणि तिला तो आवडला. संकलक म्हणून त्यांच्यासाठी हा अत्यंत समाधान देणारा सर्वात मोठा पुरस्कार होता. एका वाक्यात आपल्या कामाचा सारांश सांगताना ते म्हणाले, “प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह किंवा अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण करणे म्हणजे संकलन होय . ”.
* * *
PIB Team MIFF | S.Kane/V.Joshi/D.Rane | 56
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027289)
Visitor Counter : 58