माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'ब्रँड मजबूत करण्यासाठी आणि सीएसआर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी माहितीपटांचा फायदा' या 18 व्या मिफ्फ मधील चर्चासत्रात कॉर्पोरेट्स आणि माहितीपट निर्मात्यांचा सहभाग


ब्रँडवर संशोधन करून त्याच्याशी सुसंगत कथांचे मार्केटिंग करण्याचा कॉर्पोरेट धुरिणींचा माहितीपट निर्मात्यांना सल्ला

Posted On: 19 JUN 2024 10:20PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जून 2024

 

मुंबईतील पेडर रोडवरील एनएफडीसी-एफडी संकुल या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) स्थळी कॉर्पोरेट धुरिणींसाठी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवरील सात माहितीपट बुधवार 19 जून रोजी सादर करण्यात आले. कॉर्पोरेट विश्वासाठी या महोत्सवातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी, सह-उत्पादन, प्रायोजकत्व आणि कॉर्पोरेट्ससोबत सहयोगाची चाचपणी करणाऱ्या  माहितीपट निर्मात्यांनी 'ब्रँड मजबूत करण्यासाठी आणि सीएसआर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी माहितीपटांचा फायदा' या विशेष सत्रात त्यांच्या प्रकल्पांबद्दल अवगत केले. कॉर्पोरेट निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे चित्रपट महिला सक्षमीकरण, कला आणि संस्कृती, पर्यावरण आणि शाश्वतता, आरोग्यसेवा आणि क्रीडा या विषयांवर केंद्रित आहेत.

या सत्रानंतर तज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात लॉरियल इंडिया च्या कॉर्पोरेट अफेअर्स अँड एंगेजमेंट संचालक कृष्णा विलासिनी; मॅरिको लिमिटेड चे मुख्य विधी अधिकारी आणि ग्रुप जनरल कौन्सेल अमित भसीन; ब्रँड युनिलिव्हर चे विपणन संचालक प्रशांत व्यंकटेश आणि मिफ्फ महोत्सव संचालक आणि एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार सहभागी झाले होते. 

माहितीपट निर्मितीचे महत्त्व विशद करताना पृथुल कुमार म्हणाले की अशा चित्रपटांमध्ये सध्याच्या समाजाशी संबंधित समस्या मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे आपल्या इतिहासाचा एक भाग बनण्याची त्यांच्यात ताकद आहे. “माहितीपट हे नेहमीच त्यांच्या परिणामकारतेसाठी खूप महत्वाचे असतात,” असेही त्यांनी सांगितले. एखादी समस्या किंवा संकट ठळकपणे मांडण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्याकरिता माहितीपट हे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक विषयांवरील या माहितीपटांचे प्रायोजक बनून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निभावताना त्याद्वारे त्यांच्या ब्रँडची प्रतिमा वाढवण्याचा लाभ मिळवू शकतात असेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत माहितीपट पाहणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढली आहे असे सांगताना भारतातील चित्रपटगृहांमध्ये माहितीपट व्यावसायिकरित्या प्रदर्शित होत नसले तरी अन्य अनेक देशात ते दाखवले जात असल्याचे महोत्सव संचालकांनी निदर्शनास आणले. 

लॉरियल इंडिया च्या कॉर्पोरेट अफेअर्स अँड एंगेजमेंट संचालक कृष्णा विलासिनी यांनी माहितीपट निर्मात्यांना सल्ला दिला की एखाद्या ब्रँडद्वारे समर्थन केल्या जाणाऱ्या सामाजिक समस्यांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार त्यांचे विषय संभाव्य कंपन्यांसमोर ठेवा. त्या म्हणाल्या, "सजग व्हा आणि ब्रँड काय करत आहेत ते पहा." याचा अधिक खुलासा करताना त्यांनी सांगितले की विविध ब्रँड विविध कारणांना पाठबळ देतात, ज्यात शिक्षण, सक्षमीकरण आणि पर्यावरणापासून ते मानसिक आरोग्य समस्या, रस्त्यावरील छेडछाडीच्या विरोधात उभे राहणे इत्यादी समस्या असू शकतात. म्हणून, त्या कॉर्पोरेटना त्यांच्या ब्रँड अनुरूप विषयाला पाठबळ देणे आवडेल. सामाजिक समस्यांशिवाय अन्य ऐकिवात नसलेले अथवा बहुचर्चित नसलेले विषय देखील माहितीपटात मांडले जातात. त्यामुळे, एक चांगला माहितीपट आणि त्याला प्रायोजित करण्यासाठी तयार असलेले कॉर्पोरेट किंवा त्याला पाठबळ देण्यास तयार ब्रँड यांच्यात 'समन्वय' होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात, त्यांनी असेही सांगितले की ब्रँडसाठी प्रतिष्ठा सर्वात जास्त महत्त्वाची असते कारण ती वर्षानुवर्षांच्या मेहनतीतून मिळवलेली असते आणि म्हणूनच ती प्रतिष्ठा जपली जाण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या विषयांनाच ते पाठबळ देतील. मिलेनिअल्स आणि जेन-झेड चे खरेदीचे निर्णय त्यांना  एखाद्या ब्रँडच्या असलेल्या माहितीवर आधारित असतात असेही कृष्णा विलासिनी यांनी याबाबत उद्धृत केले. 

मॅरिको लिमिटेड चे मुख्य विधी अधिकारी आणि ग्रुप जनरल कौन्सेल अमित भसीन यांनी सांगितले की, माहितीपट हे अत्यंत संशोधनात्मक काम असून बहुश्रुत नसलेल्या देशाच्या दुर्गम भागातील विषयांवर ते प्रकाश टाकतात. सरकारी नियामक चौकटीनुसार, कॉर्पोरेट्स त्यांच्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या कारणांसाठी त्यांच्या सीएसआर निधीची गुंतवणूक करू शकत नाहीत असेही त्यांनी नमूद केले. आजकाल अनेक ब्रँड स्वतःसाठी एक उद्देश तयार करण्याचा आणि त्यावर केंद्रित एक विस्तृत कथानक प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.

“भारतासारख्या देशात, आपली विविधता, प्रादेशिक ओळख आणि संस्कृती आणि उप-संस्कृती, सांगण्यासारख्या अनेक कथा आहेत” असे मत ब्रँड युनिलिव्हरचे विपणन संचालक प्रशांत व्यंकटेश यांनी मांडले. माहितीपट जनजागृती करतात आणि आपल्याला उपाय सुचवतात, असेही त्यांनी सांगितले. ब्रँड कोणत्या प्रकारच्या माहितीपटांना मान्यता देऊ शकतात हे विशद करताना ते म्हणाले, “कामाच्या सत्य कथा खूप प्रभाव पाडतात. चांगली कथा सांगणे ब्रँडला प्रभाव वाढवण्यास मदत करू शकते.” अस्सल, सशक्त कथाकथनाला नेहमीच मागणी असते, असेही त्यांनी नमूद केले.

माहितीपटांचा प्रभाव ब्रँडवर पडू शकतो याबद्दल बोलताना, कृष्णा विलासिनी म्हणाल्या, “माहितीपटांसारखे दृश्य प्रकार सत्य आणि संधी दाखवू शकतात. जर तुम्ही सत्य कथा दाखवली तर ती लाभार्थ्यांसह इतरांना आणखी काही करण्यास प्रेरित करेल.” सरकार, कॉर्पोरेट्स, सल्लागार, चित्रपट निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थी यांसारख्या हितधारकांना एकत्र आणण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मिफ्फ चे कौतुक केले. श्री अमित भसीन म्हणाले की या सर्व हितधारकांमधील सहयोगाची ही नांदी ठरू शकते असे मत अमित भसीन यांनी व्यक्त केले. 

मीडिया आणि मनोरंजन उद्योग पोर्टफोलिओची धुरा सांभाळणारे डेलॉइट इंडियामधील जोखीम सल्लागार (आरए) प्रॅक्टिसमधील भागीदार चंद्रशेखर मंथा यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. माहितीपट हे एक बाजारपेठ आणि माध्यम साकारत असून त्याचा विकास होत आहे. एका वर्षात सुमारे 11 अब्ज माहितीपट बनवले जातात आणि लवकरच ही संख्या 16 अब्ज होईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/V.Joshi/D.Rane | 48

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026899) Visitor Counter : 39


Read this release in: English , Urdu , Hindi