सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला दिली भेट

Posted On: 16 JUN 2024 6:15PM by PIB Mumbai

पुणे, 16 जून 2024

केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, आज 16 जून 24 रोजी पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला भेट दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वैकुंठ मेहता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. संस्थेच्याच्या संचालक डॉ.हेमा यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सहकार राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डॉ. हेमा यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यकाळात या संस्थेमध्ये अनेक उपक्रम सुरू केले जातील, ज्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सहकार चळवळ अधिक बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली.

डॉ. हेमा यादव यांनी, संस्थेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवरील संक्षिप्त सादरीकरण केले. सादरीकरणा दरम्यान, संस्थेतील सात केंद्रांनी करायच्या विशिष्ट कामांचा उल्लेख करण्यात आला. तसेच सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेने राबवलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. सेंटर फॉर मॅनेजमेंट एज्युकेशन (CME) अंतर्गत गेली तीन दशके, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट–ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट (PGDM-ABM) अभ्यासक्रमाच्या 31 तुकड्यांमधून  तरुणांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सहकार, बँकिंग आणि कृषी-व्यवसाय उद्योगात 100% प्लेसमेंट (रोजगार) मिळवून देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.  


सहकार व्यवस्थापन केंद्र (सीसीएम) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सहकार व्यवसाय व्यवस्थापन पदविका (पीजी- डीसीबीएम) या अभ्यासक्रमाच्या 58 व्या तुकडी अंतर्गत, सहकार क्षेत्रात महिला विकास आणि उद्योजकतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. संस्थेने सहकार क्षेत्रासाठी प्रशिक्षण, संशोधन, सल्लागार आणि सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी उत्कृष्टतेचे केंद्र बनण्याचा दृष्टीने आपले एक पाऊल पुढे टाकले आहे.

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांनी प्राध्यापक आणि कर्मचारी सदस्यांशी 1967 पासून सहकार क्षेत्रात संस्थेची भूमिका समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून संवाद साधला. मोहोळ यांनी संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या सर्व केंद्रांचा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला.तसेच त्यांनी सहकारी संस्थांबाबत आपले विचार मांडले. आपल्या भाषणात मंत्री महोदयांनी संस्थेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने समृद्धीसाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेऊन संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही भेट संस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण वळण देणारी ठरेल.यामुळे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका अधिक सक्षम होईल. त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांमुळे भविष्यातील उपक्रमांची संख्या वाढेल आणि देशभरातील सहकारी प्रशिक्षण कार्यक्रमांचा प्रभाव आणि पोहोच वाढेल .


M.Iyengar/R.Agashe/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2025721) Visitor Counter : 207


Read this release in: English