संरक्षण मंत्रालय

वायूसेना अकादमीमध्ये संयुक्त दीक्षांत संचलनाचे आयोजन

Posted On: 15 JUN 2024 12:10PM by PIB Mumbai

 

भारतीय वायूसेनेच्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखेच्या 235  कॅडेट्सचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल दुंडीगल येथे वायूसेना अकादमीमध्ये 15 जून 2024 रोजी संयुक्त दीक्षांत संचलनाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल फ्लाईट कॅडेट्सना वायूसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी आढावा अधिकारी म्हणून प्रेसिडेन्ट्स कमिशन प्रदान केले. पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 22 महिलांचा समावेश होता, ज्यांना भारतीय वायूसेनेच्या विविध शाखांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. या समारंभाला भारतीय वायूसेना आणि संबंधित सेवांमधील अनेक मान्यवर तसेच पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी भारतीय नौदलाचे 9 अधिकारी, तटरक्षक दलाचे 9 अधिकारी आणि परदेशी मित्र देशांचा एक अधिकारी यांना देखील फ्लाइंग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विंग्ज प्रदान करण्यात आले. हे अशा प्रकारचे पहिलेच संयुक्त दीक्षांत संचलन होते, ज्यामध्ये 4 वर्षांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ग्राउंड ड्युटी शाखांसाठी दाखल झालेल्या 25 कॅडेट्सना देखील अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यापैकी 5 अधिकाऱ्यांना प्रशासन शाखेत, 3 जणांना लॉजिस्टिक्स शाखेत आणि 17 जणांना तांत्रिक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख हवाई अधिकारी एयर मार्शल नागेश कपूर आणि वायूसेना अकादमीचे प्रमुख एयर मार्शल एस. श्रीनिवास यांनी वायूसेनाप्रमुखांचे स्वागत केले. परेड कमांडरकडून आरओंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अतिशय प्रभावी संचलन करण्यात आले. दीक्षांत संचलनाच्यावेळी अतिशय उत्तम समन्वय आणि ताळमेळ राखत पिलेटस पीसी-7 एमके-टू, हॉक, किरण आणि चेतक हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असलेल्या चार प्रशिक्षण विमानांनी हवाई सलामी दिली.    

***

M.Pange/S.Patil/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025515) Visitor Counter : 40