माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईत सुरू असलेल्या अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवात 1 जून 2024 पर्यंत दोन्ही देशांतील उल्लेखनीय चित्रपट केले जाणार प्रदर्शित


आंतर सांस्कृतिक रुची आणि सहयोग वाढवणे हा अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश

Posted On: 29 MAY 2024 6:35PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2024

 

27 मे 2024 (सोमवार) रोजी एका नेत्रदीपक उद्घाटन समारंभाने सुरूवात झालेल्या अर्जेंटिना आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवात चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रोमांचक रेलचेल असणार आहे. हा चित्रपट महोत्सव 1 जून 2024 पर्यंत सुरू राहणार असून यात विविध प्रकारचे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत तसेच  आंतर सांस्कृतिक रुची आणि सहयोग वाढवणे हा या चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी म्हणजे गेल्या सोमवारी प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता अर्जेंटिनियन भाषेतील चित्रपट - ‘अन लुगार एन एल मुंडो’. हा चित्रपट प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद लाभत आहे. अर्जेंटिनाचे महावाणिज्य दूत डॅनियल क्वेर कॉन्फलोनीरी, प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विवेक वासवानी आणि एनएफडीसी चे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर  एका थेट चर्चेत, कॉन्फलोनीरी आणि  रामकृष्णन यांनी भारत आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांच्या  चित्रपट पुनर्संचयनाच्या संयुक्त प्रयत्नांवर भाष्य केले. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सिनेमॅटिक वारसा जतन करण्यासाठी चित्रपट महोत्सव आणि चित्रपट प्रदर्शनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर या दोघांनी भर दिला. तसेच, भावी पिढ्यांसाठी चित्रपट एक समृद्ध कलाकृती म्हणून कसा काम करतो हे अधोरेखित केले.

 

याप्रसंगी अभिनेता ताहा शाह बदुशा हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कास्टिंग डायरेक्टर  डॉली ठाकूर (ज्या एनएफडीसी ची सह-निर्मिती- असलेल्या "गांधी" चित्रपटाच्या निर्मितीतील त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी ओळखल्या जातात) आणि एनएफडीसी चे माजी व्यवस्थापकीय संचालक तसेच "रुदाली" या यशस्वी चित्रपटाचे निर्माते रवी गुप्ता हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव सामायिक केले, या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल एनएफडीसी प्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच पुनर्संचयित चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एनएफडीसी ने घेतलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली. ताहा शाह बदुशा यांनी आपण या चित्रपट महोत्सवाचा भाग असल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच चित्रपट महोत्सव आयोजित करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल एनएफडीसी ची प्रशंसा केली. संजय लीला भन्साळी यांच्या नेटफ्लिक्सवरील "हीरामंडी: द डायमंड बझार" या मालिकेतील कामगिरीबद्दल ताहा शाह बदुशा यांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.  

संध्याकाळी या महोत्सवाला आणखी एक सांस्कृतिक झालर जोडणारा अनोखा टॅंगो नृत्य प्रकार हर्नॉन ओहाको आणि शेफाली यांनी सादर केला. त्यांच्या या नृत्याविष्काराने चित्रपट कला आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा एक महत्त्वपूर्ण उत्सव असलेल्या महोत्सवातील प्रेक्षकांना मोहित केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 मे 2024 रोजी, एनएफडीसी चा रसिकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट 'एक दिन अचानक' प्रदर्शित करण्यात आला. तिसऱ्या दिवसापासून म्हणजेच आजपासून प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे : 'मेड इन अर्जेंटिना' (29 मे, 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे), 'रुदाली' (30 मे, 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे), 'कसास डी फुएगो' (31 मे, 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे) आणि 'मंथन' (1 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे).  मुंबईतील पेडर रोड येथील एनएफडीसी- नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या प्रेक्षागृह II मध्ये संध्याकाळी 4:00 वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. 

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022112) Visitor Counter : 55


Read this release in: English