भूविज्ञान मंत्रालय
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून नैऋत्य मोसमी (मान्सून) पाऊस 2024च्या हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) अद्ययावत दीर्घकालीन अंदाज
Posted On:
27 MAY 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2024
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2024 च्या नैऋत्य मोसमी (मान्सूनच्या) पावसाच्या हंगामाबाबतच्या (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. आज नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या वार्ताहर परिषदेत विभागाने जून 2024साठी मासिक पाऊसमान आणि तापमानाचे भाकित देखील जारी केले. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी हा अंदाज सादर केला.
दीर्घकालीन अंदाजाची ठळक वैशिष्ट्ये
- प्रमाणानुसार नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात ± 4% मॉडेल त्रुटीसह दीर्घकालीन सरासरीच्या 106% राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे 2024 मधील मान्सून हंगामात(जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
- मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतावर मान्सूनचा पाऊस सामान्य सरासरीपेक्षा जास्त(>106% of LPA) राहण्याची आणि वायव्य भारतावर सामान्य(92-108% of LPA) आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (<94% of LPA) राहण्याची शक्यता आहे.
- देशातील बहुतांश पावसावर आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सूनच्या गाभा क्षेत्रामध्ये(MCZ) नैऋत्य मोसमी हंगामाचा पाऊस बहुधा सामान्यपेक्षा जास्त(>106% of LPA) राहण्याची शक्यता आहे.
- जून महिन्यात दक्षिणी द्वीपकल्पीय भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात मासिक कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर दक्षिणी द्वीपकल्पीय भागात सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असेल.
- या वर्षाच्या प्रारंभी कटिबंधीय प्रशांत क्षेत्राच्या वर आढळलेली भक्कम एल निनो स्थिती अतिशय वेगाने कमकुवत होत जाऊन कमकुवत एल निनोमध्ये रुपांतरित झाली आहे आणि सध्या एनसो तटस्थ स्थितीत संक्रमित होत आहे. मान्सून हंगामाच्या प्रारंभी एनसो तटस्थ स्थिती प्रस्थापित होणार असल्याचे आणि मान्सून हंगामाच्या नंतरच्या काळात ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यता ताज्या हवामान भाकिताच्या मॉडेलमधून सूचित होत आहे.
टीप- जुलै महिन्याच्या पाऊसमानाचा आगाऊ अंदाज हवामान खात्याकडून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी करण्यात येईल.
इंग्रजीमधून अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.
हिंदीमधून अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021865)
Visitor Counter : 110