संरक्षण मंत्रालय
“ऑलिव्ह ग्रीन - गोइंग ग्रीन” भारतीय लष्कराला मिळाली पहिली हायड्रोजन बस
Posted On:
27 MAY 2024 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2024
हरित आणि शाश्वत वाहतूक उपाय शोधण्याचा दृढ संकल्प प्रदर्शित करत, भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचण्यांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) बरोबर सहयोग केला आहे. नवोन्मेष आणि पर्यावरण संवर्धन कार्याप्रती आपल्या वचनबद्धतेसाठी भारतीय लष्कर ओळखले जाते.
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान, हायड्रोजन इंधनावर चालणारी एक बस भारतीय लष्कराला सुपुर्द करण्यात आली. ही घटना म्हणजे भारतीय लष्कर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील परस्पर फायदेशीर भागीदारीची सुरूवात आहे. या सामंजस्य करारात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि भविष्यासाठी शाश्वत वाहतूक उपायांना पुढे नेण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला आहे.
हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान इलेक्ट्रो-केमिकल प्रक्रियेद्वारे हायड्रोजन वायूचे विजेमध्ये रूपांतर करून इंधनाचा स्वच्छ आणि कार्यक्षम पर्याय उपलब्ध करून देते. या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ वातावरणात सोडली जाते, त्यामुळे शून्य उत्सर्जन सुनिश्चित होते.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये 37 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. ही बस 30 किलो हायड्रोजन इंधनाच्या पूर्ण भरलेल्या टाकीवर 250-300 किमीचे प्रभावी मायलेज देते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 21 मार्च 2023 रोजी, उत्तर सीमेवर हरित हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड पॉवर प्लांट्सच्या स्थापनेसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार करणारे भारतीय लष्कर पहिली सरकारी संस्था बनले आहे. चुशुल येथे एक पथदर्शी प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प 200 किलो वॅटचा हरित हायड्रोजन आधारित मायक्रोग्राम दुर्गम भूभाग आणि अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत तैनात असलेल्या सैनिकांना 24x7 स्वच्छ वीज प्रदान करेल.
भारतीय लष्कर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बससाठीचा उपक्रम , नवोन्मेष आणि पर्यावरणीय जबाबदारीवर लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण वाटचाल दर्शवत स्वच्छ आणि हरित वाहतूक उपाय उपलब्ध करून देतो.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021842)
Visitor Counter : 184