दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन्स अँड इन्फर्मेशन सोसायटी डे’ निमित्त, गाझियाबाद येथील एनटीआयपीआरआयटी संस्थेतर्फे “जागतिक मानके आणि बौद्धिक मालमत्ता अधिकार” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
18 MAY 2024 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2024
भारतातर्फे 15 ते 24 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेच्या (WTSA) पार्श्वभूमीवर, 17 मे 2024 रोजी गाझियाबाद येथे आयोजित “जागतिक मानके आणि बौद्धिक मालमत्ता अधिकार” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत, कोणत्याही देशाच्या विकासात “जागतिक मानके आणि बौद्धिक मालमत्ता अधिकार (आयपीआर)” चे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय भागधारकांना जागतिक भागीदारी प्राप्त करण्यासाठी आणि दूरसंचार मानकांमधील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींशी संरेखित करण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्राप्त झाले.

नवी दिल्लीतील एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटर येथील आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) यांच्या सहकार्याने, दूरसंचार विभागाचा (DoT) उपक्रम असलेल्या गाझियाबाद येथील राष्ट्रीय दूरसंचार धोरण संशोधन, नवोन्मेष आणि प्रशिक्षण संस्था (एनटीआयपीआरआयटी), तर्फे, ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन्स अँड इन्फर्मेशन सोसायटी डे’ निमित्त ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. दूरसंचार सचिव डॉ नीरज मित्तल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दूरसंचार विभागाचे अधिकारी, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघातील तज्ञ, प्राध्यापक तसेच दिल्ली आणि एनसीआरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते. राष्ट्रीय दूरसंचार धोरण संशोधन, नवोन्मेष आणि प्रशिक्षण संस्था (एनटीआयपीआरआयटी) चे उपमहासंचालक (ICT) अतुल सिन्हा यांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे आणि सर्व सहभागींचे स्वागत केले.

डॉ नीरज मित्तल यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी मानकीकरणामध्ये जागतिक सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. ए. के. साहू, सदस्य (एस), यांनी जागतिक मानकीकरण प्रक्रियेत राष्ट्रीय योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तर आर. आर. मित्तर, महासंचालक (टी), यांनी दूरसंचार मानकांचे बारकावे विशद केले. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या नवी दिल्लीतील क्षेत्र कार्यालयातील वरिष्ठ सल्लागार आर. शाक्य, यांनी, आपल्या विशेष भाषणात, कार्यशाळेला उपस्थित सहभागींना आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदे (WTSA-24) बद्दलही तपशीलवार माहिती दिली.

आगामी जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (WTSA) - 2024 मध्ये भारतीय तज्ञांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. त्याचबरोबर कार्यशाळेतील सहभागींना जागतिक मानके आणि बौद्धिक संपदा क्षेत्राशी संलग्न होण्याची मोठी संधीही या माध्यमातून प्राप्त झाली.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020998)
Visitor Counter : 85