कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या चालू तपासाशी संबंधित प्रकरणातील पुढील कारवाई दरम्यान सीबीआयने अंदाजे 1.42 कोटी रुपये हस्तगत केले

Posted On: 07 MAY 2024 10:27PM by PIB Mumbai

मुंबई, 7 मे 2024

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)च्या  मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचे  सहाय्यक संचालक (एडी) आणि  ठाणे येथील एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासा  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अंदाजे 1,42,70,000 रुपये रोख  रक्कम, दोन सोन्याची बिस्किटे, एक लॅपटॉप व गुन्ह्याशी संबंधित इतर कागदपत्रे  शोध मोहिमेदरम्यान केलेल्या  कारवाईत हस्तगत केली.

सीबीआयने 04.05.2024 रोजी एफएसएसएआय मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाच्या सहाय्यक संचालक (तांत्रिक) सह दोन खाजगी व्यक्ती म्हणजे ठाणे स्थित खाजगी कंपनीचे संचालक आणि एक वरिष्ठ व्यवस्थापक, ती खाजगी कंपनी आणि इतर अज्ञात व्यक्ती अशा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.यात  असे आरोप करण्यात आले होते की, एफएसएसएआय मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचा सहाय्यक संचालक   अनेक मध्यस्थांच्या संगनमताने, सार्वजनिक सेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अप्रामाणिकपणा करत अन्न पदार्थ व्यवसायिक  आणि इतर इच्छुकांकडून लाच मागणे आणि स्वीकारणे या बेकायदेशीर आणि भ्रष्ट पद्धतींमध्ये गुंतलेला आहे.

आरोपी  एफएसएसएआयचा  सहाय्यक संचालक  खाजगी कंपनीच्या आरोपी वरिष्ठ व्यवस्थापकाकडून  लाच घेत होता. त्या कंपनीच्या संचालकाच्या वतीने त्यांची प्रलंबित बिले मंजूर करण्याच्या बदल्यात तो लाच देत होता असा आरोपही करण्यात आला होता.

त्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि आरोपी सहायक संचालक(एफएसएसएआय) याला  वरिष्ठ व्यवस्थापक आणि खाजगी कंपनीच्या अन्य प्रतिनिधीकडून  1,20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचेच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर खासगी कंपनीच्या आरोपी संचालकालाही अटक करण्यात आली.

यापूर्वी आरोपींच्या कार्यालयात व निवासी परिसरात झडती घेतली असता अंदाजे 37.3 लाख रुपये  रोख, सुमारे 45 ग्रॅम सोने आणि विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. आजच्या  सापळ्यानंतर सीबीआयने केलेल्या विविध शोध मोहिमांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची  सोने/सोन्याच्या बिस्किटांसह अंदाजे किंमत 1.8 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे.

पुढील तपास सुरू आहे.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019896) Visitor Counter : 83


Read this release in: English