नौवहन मंत्रालय
सागरी क्षेत्रात नाविकांच्या अनुकरणीय भूमिकेचा गौरवः “ पंतप्रधानांच्या पोशाखावर पहिला मर्चंट नेव्ही ध्वज” टाचून राष्ट्रीय सागरी सोहळा सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात
देशभरात प्रमुख बंदरांमध्ये 61 व्या राष्ट्रीय सागरी दिवस सोहळ्यांचे होणार आयोजन
Posted On:
30 MAR 2024 12:55PM by PIB Mumbai
5 एप्रिल रोजी असलेल्या राष्ट्रीय सागरी दिवसानिमित्त एक आठवडाभर आयोजित होणार असलेल्या सोहळयासाठी सज्ज होत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांच्या हस्ते ‘मर्चंट नेव्ही ध्वज’ प्रदान करून सन्मान करण्यात आला. यावेळी नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याबरोबरच एक स्मृतिचिन्ह देखील पंतप्रधानांना प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना टी के रामचंद्रन यांनी जागतिक पुरवठा साखळी अखंड सुरू ठेवण्यामध्ये भारतीय नाविकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. राष्ट्रीय सागरी सप्ताह सोहळा म्हणजे सागरावरील या अऩाम वीरांना करण्यात येणारे अभिवादन आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मर्चंट नेव्हीचा ध्वज अभिमानाने लावून या सोहळ्याच्या सप्ताहाची सुरुवात झाल्याचे सूचित केले.
देशभरात सर्वत्र मुंबई, कोलकाता, चेन्नई, कांडला, विशाखापट्टणम् यांसारख्या प्रमुख बंदरांबरोबरच, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मध्यस्थानावरील, लहान आणि अंतर्गत जलमार्गावरील बंदरांमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय सागरी उद्योगाने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपल्या राष्ट्रीय जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान देत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन या सोहळ्याच्या निमित्ताने होत असते.
नौवहन क्षेत्राला पुढे नेण्यामध्ये आणि देशाच्या समृद्धीला चालना देण्यामध्ये आपल्या नाविकांनी केलेली अमूल्य सेवा आणि त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा गौरव करण्यासाठी एक आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मर्चंट नेव्ही ध्वजदिन, परिसंवाद, वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान हौतात्म्य पत्करणाऱ्या खलाशांचा सन्मान करण्यासाठी पुष्पांजली कार्यक्रम या कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असेल.
या सर्व कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रमुख कार्यक्रमाचे दरवर्षी 5 एप्रिल रोजी आयोजन करण्यात येते. आपल्या सागरी उद्योगाने केलेल्या कामगिरीचा गौरव करण्याची आणि अविचल समर्पित वृत्तीने ज्या धाडसी खलाशांनी आपल्या देशाची सेवा केली आहे त्यांना अभिवादन करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध होत असते.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016713)
Visitor Counter : 121