शिक्षण मंत्रालय

नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उद्या देशभरात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) होणार

Posted On: 16 MAR 2024 2:20PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग उद्या युएलएलएएस अर्थात नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) घेणार आहे. 23 राज्यांतील 37 लाख विद्यार्थी या महत्त्वाच्या देशव्यापी मूल्यांकन चाचणीला बसणार आहेत. या चाचणीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (डाएटस) आणि सरकारी/अनुदानित शाळांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. मूल्यांकनामध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयाला 50 याप्रमाणे एकूण 150 गुणांची ही चाचणी आहे. नोंदणीकृत निरक्षर विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी विकसित केली आहे.

यापूर्वी 2023 च्या मार्च आणि सप्टेंबर महिन्यात ही चाचणी झाली होती. 24 सप्टेंबर 2023 रोजी झालेली चाचणी 17,39,097 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 15,58,696 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. आजपर्यंत एकूण 36,00,870 विद्यार्थ्यांना या चाचणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. बहुभाषिकतेला चालना देणे आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा स्थानिक भाषेच्या वापरावर भर देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने ही चाचणी प्रादेशिक भाषेत घेतली जाते. प्रादेशिक भाषांमध्ये ही चाचणी होत असल्याने भाषिक विविधतेला प्रोत्साहन मिळण्याबरोबर त्या-त्या भाषेचे संवर्धन होते.

यावेळी चंदीगड, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि गोव्यासह काही केंद्रशासित प्रदेशांनी या चाचणीच्या माध्यमातून 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या अध्यापन-शिक्षण सत्रांच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण आहे. पात्र विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेकडून प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रात मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये आत्मसात करण्यात यश मिळवल्याचा उल्लेख असतो.

उद्या होणारी ही चाचणी म्हणजे विकसित भारत आणि जन जन साक्षर भारतची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नवभारत साक्षरता उपक्रम देशभरातील साक्षरता दर वाढवण्यासाठी सातत्याने  प्रयत्न करत असून या प्रयत्नांना मिळणारे यश दृष्टीपथात आहे.

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015195) Visitor Counter : 123