ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठीच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन


पीयूष गोयल यांनी चंदिगढ, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमधील राज्य ग्राहक आयोग कार्यालयात उभारण्यात आलेल्या दूरदृश्य प्रणाली सुविधेचे केले उद्घाटन

नेटवर्क टाइम प्रोटोकॉल द्वारे भारतीय प्रमाणवेळेचा प्रसार सुरू

एकात्मिक किंमत देखरेख डॅशबोर्डचे अनावरण

ग्राहकांच्या हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी सुविहित तक्रार निवारणासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे अनावरण

आज आरंभ झालेल्या उपक्रमांमुळे ग्राहकांचे सक्षमीकरण तर होईलच शिवाय त्यांच्या हिताचे आणि हक्कांचे संरक्षण होईल : पीयूष गोयल

नवीन भारत ग्राहक संरक्षणाकडून ग्राहकांच्या समृद्धीकडे वाटचाल करत आहे : पीयूष गोयल

ग्राहक व्यवहार विभागाने 'जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त' मुंबई येथे "ग्राहकांसाठी न्याय्य आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता' या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमाचे केले आयोजन

Posted On: 15 MAR 2024 6:49PM by PIB Mumbai

मुंबई, 15 मार्च 2024

 

जागतिक ग्राहक हक्क दिन 2024 च्या निमित्ताने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचे मुंबईत आयोजित कार्यक्रमात उदघाटन केले.

ग्राहक व्यवहार क्षेत्रात वस्तू आणि सेवा कशाप्रकारे मिळवता येतील, त्यांचा लाभ घेणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे याबाबतीत क्रांती घडवून आणण्यासाठी नैतिक आणि पारदर्शक पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर असलेला ग्राहक व्यवहार विभागाचा भर या संकल्पनेतून  प्रतिबिंबित होतो.

  

या निमित्ताने सुरू करण्यात आलेले विविध उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

  1. राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगामध्ये दूरदृश्य प्रणाली सुविधेचा शुभारंभ: यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 2019 अन्वये ई फायलिंग करणे सुलभ होईल. ई-जागृति पोर्टल ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचे जलद आणि त्रासमुक्त निराकरण करण्यासाठी तक्रारींचे सुलभ ई-फायलिंग करण्याची सुविधा देते. दूरदृश्य प्रणाली (हायब्रीड मोड) सध्या चंदीगड, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे कार्यरत आहे.
  2. नेटवर्क टाइम प्रोटोकॉल द्वारे भारतीय प्रमाणवेळेचा प्रसार: यामुळे सर्व मोबाईल सेवा प्रदात्यांना भारतीय प्रमाण वेळ (IST) बरोबर जुळवून घेता येईल. त्याच बरोबर यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोरणात्मक क्षेत्रातील वास्तविक वेळ अनुप्रयोग एकरूप करण्यात देखील मदत होईल.
  3. राजस्थान मध्ये जयपूर मधील मांडा येथील राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळेत भारतीय मानक ब्युरोच्या सहकार्याने, अत्याधुनिक एकीकृत वीज पारेषण  तारा  उपकरणे चाचणी सुविधेची स्थापना
  4. अद्ययावत  एकात्मिक किंमत देखरेख डॅशबोर्ड - 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात स्थापन केलेल्या 550 किंमत देखरेख केंद्रांद्वारे डॅशबोर्ड 22 जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या दैनंदिन किरकोळ आणि घाऊक किमतींचे निरीक्षण करण्यासोबत माहितीचे अधिक अभ्यासपूर्ण स्वरूपात सादरीकरण आणि विश्लेषण प्रदान करेल.
  5. आंतरराष्ट्रीय वैध मापन शास्त्र (ओआयएमएल) प्रमाणन संस्था म्हणून भारताकडून पहिले प्रमाणपत्र जारी: ग्राहक व्यवहार विभाग हा  ओआयएमएल- सीएस (प्रमाणीकरण प्रणाली) मधील 14 ओआयएमएल जारी करणाऱ्या प्राधिकरणांपैकी आणि 27 चाचणी प्रयोगशाळांपैकी एक बनला आहे आणि जगभरात स्वीकारली  जाणारी ओआयएमएल प्रमाणपत्रे जारी करू शकतो. या महत्त्वाच्या दिवशी आरआरएसएल , अहमदाबादने तोखेम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला पहिले ओआयएमएल  प्रमाणपत्र जारी केले.
  6. श्रेणी म्हणून ग्राहकांच्या हक्कांच्याउल्लंघनाचे विना अडथळा निवारण करण्यासाठी सीसीपीए संकेतस्थळाचा प्रारंभ: या संकेतस्थळावर श्रेणी संबंधी कृती आधारावर ग्राहकांच्या तक्रारी जलद गतीने आणि सहज  दाखल करता येतील, तसेच घरी बसून त्यांचा तक्रारीचे स्वरूप, तक्रारीचे वर्णन, संबंधित दस्तऐवज/चित्रफीत अपलोड करण्याची आणि त्यांच्या तक्रारीच्या प्रगतीचा ऑनलाइन मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ग्राहकांच्या हक्कांना आवाज देणारे सीसीपीए द्वारे मंजूर केलेले अनेक सल्ले, मार्गदर्शक तत्त्वे आणि आदेश पाहण्यासाठी  हे संकेतस्थळ एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करते.


केंद्रीय मंत्री गोयल यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले:

  1. "प्राचीन भारतातील ग्राहक संरक्षण आणि वैध मापनशास्त्र : प्राचीन विचार आणि ज्ञान": हे पुस्तक भारतीय आर्थिक इतिहास केंद्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, व्यवस्थापन क्षेत्रातील भारतातील प्रमुख उच्च शिक्षण संस्था एसआरसीसी  आणि ग्राहक व्यवहार विभाग. यांचा संयुक्त प्रयत्न आहे.
  2. ग्राहक व्यवहार विभागाच्या सहकार्याने  अमर चित्र कथा द्वारे तयार केलेले "ग्राहक प्रवास" पुस्तक 1 आणि 2: तरुणांमध्ये  जागरुकता वाढवणे आणि मुलांना सक्षम करणे ही या  पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या पुस्तिका केवळ मुलांचे मनोरंजन करत नाहीत तर ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी एक माध्यम म्हणूनही काम करतात.

पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि ग्राहक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या डिजिटल व्यवस्थेला  चालना देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने आयआयटी  (बीएचयू ) च्या सहकार्याने सुरू केलेल्या डार्क पॅटर्न बस्टर हॅकाथॉन 2023 च्या विजेत्यांना  गोयल यांच्या हस्ते गौरवण्यात आले .

पाँडिचेरी विद्यापीठाच्या  डॉ.बी.आर. आंबेडकर सरकारी विधी महाविद्यालयाच्या  मूट कोर्ट स्पर्धेतील विजेत्यांचाही गोयल यांनी सत्कार केला.  ही स्पर्धा 4 टप्प्यात आणि 55 संघांमध्ये घेण्यात आली ज्यामध्ये 165 सहभागी भारतातील 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात आणि या स्पर्धेत  उत्पादन दायित्व आणि समर्थन दायित्व यावर लक्ष केंद्रित केले होते.

जागतिक ग्राहक हक्क दिन, दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो, हा जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हक्कांच्या पुरस्कर्त्यांसाठी उत्साह वाढवणारा असून  त्यांना प्रभावित करणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रकाश टाकण्याची संधी प्रदान करतो, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियूष गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले. ग्राहकांसाठी न्याय्य आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता ही या वर्षीच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे. ही अतिशय संयुक्तिक असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य हेतूने वापर केला गेला तर ते लोकांच्या विविध कामांमध्ये आणि जीवनात चांगले बदल घडवून आणू शकते असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक दुधारी तलवार आहे असे ते म्हणाले.  कृत्रिम बुद्धिमत्ता संधी प्रदान करते ज्याचा  भारताने  फायदा घेतला पाहिजे असे सांगत सर्व तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलचे ज्ञान वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

आज सुरू करण्यात आलेले उपक्रम केवळ ग्राहकांना सक्षमच बनवणार नाहीत तर त्यांचे हित आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करतील, असे गोयल यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरण ठरवताना ग्राहकांचे हित नेहमीच महत्त्वाचे मानले आहे. ग्राहकांचे समाधान हा प्रत्येक व्यवसाय, उद्योग किंवा व्यापाराचा प्रमुख हेतू असला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्राहक हक्क रुपरेषा जारी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे ग्राहकांना त्यांचे हक्क जाणून घेण्यास मदत होईल. त्यांना अनुचित व्यापार पद्धतींपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकार पावले उचलत आहे आणि जे वस्तू आणि सेवा प्रदान करतात त्यांना त्यांच्यासाठी जबाबदार बनवतील असे ते म्हणाले. सिंधू संस्कृतीच्या काळातही वजनाचे तराजू आणि वजने उपलब्ध होती, असे त्यांनी नमूद केले. भारताचे वैध मापनशास्त्र प्राचीन काळात उदयास आले आहे, असेही ते म्हणाले.  अधिकार हे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांसोबत येतात, याची आठवणही त्यांनी नागरिकांना करून दिली.

ग्राहक व्यवहार विभाग जलद गतीने कार्याभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे असे गोयल यांनी नमूद केले. यामुळे भविष्यात देशाला महागाईची समस्या भेडसावणार नाही. नवीन भारत, ग्राहक संरक्षणाकडून ग्राहक समृद्धीकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.

2047 पर्यंत विकसित भारत प्रत्यक्षात दिसेल याची पंतप्रधानांनी हमी दिली आहे. विकसित भारतात आपल्या परंपरांसाठी विशेष स्थान असेल. आपला वारसा आणि भूतकाळ आपल्याला खूप काही शिकवतो, असेही ते म्हणाले. आता सरकार साचेबद्ध काम करत नाही तर संपूर्ण सरकारी दृष्टीकोन त्यात अवलंबला आहे. जेव्हा संपूर्ण सरकार काम करते तेव्हा संपूर्ण देशाचा फायदा होतो असे त्यांनी सांगितले.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाग घेतला. “सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास” वर त्यांनी भर दिला.  तंत्रज्ञानाच्या जलद विकासामुळे आणि ई-कॉमर्समधील विकासामुळे, ग्राहक, नवीन जोखीम आणि आव्हानांना बळी पडतात. म्हणूनच ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संबंधित प्रकरणे प्रभावीपणे आणि वेळेवर निकाली काढणे अत्यंत आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/Bhakti/SonalC/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015034) Visitor Counter : 73


Read this release in: English , Urdu , Hindi