सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे बीबीएसएसएल, एनसीओएल, आणि एनसीईएल या तीन बहु-राज्य सहकारी संस्थांच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे केले उद्घाटन
Posted On:
13 MAR 2024 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल), नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल), आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (एनसीईएल) या तीन बहु-राज्य सहकारी संस्थांच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी, यांच्यासह एनसीईएल, एनसीओएल आणि बीबीएसएसएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, आज तीन सहकारी संस्थांच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन करून आपण एक महत्वाचे पाऊल पुढे टाकत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण ‘सहकार से समृद्धी (सहकाराद्वारे समृद्धी)’ या दृष्टीकोनातून पुढे जात आहोत, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सहकार मंत्रालयाने सुरुवातीपासूनच, तफावत दूर करणे, सहकाराचा विस्तार करणे, उलाढाल आणि नफा वाढवणे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने उपक्रमांचे नियोजन केले आहे. या तिन्ही सहकारी संस्थांची स्थापना हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली. अमित शाह म्हणाले की, आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 31 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या कार्यालयात या संस्थांचे मुख्यालय सुरू होत आहे. या कार्यालयात आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व नवोन्मेष अनुभवू आणि आत्मसातही करू असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, या तिन्ही संस्था शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करत आहेत.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, आम्ही AMUL, NAFED, NCCF, IFFCO, KRIBHCO, NABARD, आणि NCDC या देशातील आघाडीच्या सहकारी संस्थांना मूळ प्रवर्तक म्हणून या तिन्ही संस्थांची स्थापना करण्यासाठी एकत्र आणले आहे. ते म्हणाले की, नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेडकडे अंदाजे 7,000 सदस्यांकडून, नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडकडे 5,000 आणि भारतीय बीज सहकारी समितीकडे 16,000 सदस्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अमीत शाह म्हणाले की, यावरून या कामाची व्याप्ती, तसेच एवढ्या कमी वेळात आम्ही किती कार्यक्षमतेने या कामाचा तळागाळापर्यंत प्रसार केला, हे दिसून येते. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, या तिन्ही संस्थांची स्थापना बहुआयामी उद्दिष्टाने करण्यात आली होती, आणि जेव्हा ती पूर्णपणे कार्यान्वित होतील तेव्हा आपल्या देशातील अनेक समस्यांवरील उपाय मिळतील.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014434)
Visitor Counter : 130