माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एनएफडीसी - एनएमआयसी द्वारे आयोजित ‘वुमन इन सिनेमा शेपिंग ग्लोबल नॅरेटिव्हज’ या विषयावरील पॅनल चर्चेत जागतिक चित्रपटसृष्टीतील महिलांचा सहभाग
Posted On:
13 MAR 2024 5:40PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मार्च 2024
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने (एनएमआयसी) आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 च्या उत्सवाचा एक भाग म्हणून सोमवारी (11 मार्च, 2024) ‘अ सिनेमॅटिक सेलिब्रेशन ऑफ वुमनहुड’ या विषयावरील चर्चासत्र आयोजित केले होते.

यावेळी ‘वुमन इन सिनेमा शेपिंग ग्लोबल नॅरेटिव्हज (जागतिक सिनेमाच्या आशय निर्मितीवरील महिलांचा प्रभाव )’ या विषयावर मिश्र माध्यमातून (थेट आणि ऑनलाईन) एका पॅनल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राचे सूत्रसंचालन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक जयप्रद देसाई यांनी केले. पॅनेलचे सदस्य पुढील प्रमाणे:-
- इराणी चित्रपट निर्मात्या आणि महिला हक्क कार्यकर्त्या महनाज मोहम्मदी
- भारतीय चित्रपट संपादक आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या संयुक्ता काझा
- फ्रेंच कॉस्च्युम डिझायनर आणि फ्रेंच AFCCA च्या अध्यक्ष मॅडलिन फॉन्टेन
- सर्बियन सिनेमॅटोग्राफर आणि IMAGO च्या उपाध्यक्ष बोजाना आंद्रिक
- लेबनीज साऊंड डिझायनर, चित्रपट निर्मात्या आणि 72 व्या बर्लिनेल च्या ज्युरी राणा ईड
अंतर्मुख करणाऱ्या या सत्रात जगभरातून आलेल्या पॅनेल सदस्यांनी सिनेसृष्टीत महिला म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव आणि चित्रपट उद्योगातील लैंगिक रूढ संकेतांना सामोरे जातानाचे आपले अनुभव सांगितले. त्यानंतर प्रेक्षकांसाठी प्रश्नोत्तराचे सत्र झाले.

मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्य दूत जी-मार्क सेर-शार्लेट आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. फ्रान्सच्या महावाणिज्य दूतांनी लैंगिक असमानतेवर मात करण्याबाबतचे आपले विचार मांडले आणि फ्रेंच सिनेमातील महिला, या विषयावर ते बोलले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, क्लो झाओ दिग्दर्शित नोमॅडलँड या 2020 सालच्या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. सर्व अडचणींचा सामना करून जगण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या एका स्त्रीचा प्रवास हा चित्रपट प्रभावीपणे सादर करतो.

या उत्सवाच्या माध्यमातून, महिलांच्या परिश्रमांचा गौरव करणे आणि सिनेमातील कथानकांना आकार देण्यामधील त्यांची भूमिका अधोरेखित करणे, हे NFDC आणि NMIC चे उद्दिष्ट आहे. स्त्रीत्व, आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व घटकांचा हा दाखला आहे.
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014248)
Visitor Counter : 63