कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज झारखंडमधील चाईबासा येथे 3 दिवसीय राष्ट्रीय दुग्धव्यवसाय मेळा आणि कृषी प्रदर्शनाचे केले उद्घाटन
Posted On:
09 MAR 2024 4:58PM by PIB Mumbai
आदिवासी कार्य, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे 3 दिवसीय राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मेळा आणि कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. दुग्ध व्यवसाय मेळा, हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दुग्ध व्यवसाय शास्त्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जातो. देशातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
या मेळ्यात उभारलेल्या स्टॉल्सना केंद्रीय मंत्री मुंडा यांनी भेट दिली आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ ) तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे देश अन्न उत्पादनात स्वावलंबी झाला आहे, असे अर्जुन मुंडा यावेळी म्हणाले. यासाठी त्यांनी पीक फवारणी आणि पीक निरीक्षणासाठी कृषी ड्रोनचा वापर या तंत्रज्ञानाचे उदाहरण दिले.
या मेळाव्यात 6 हजारांहून अधिक पशुपालक, शेतकरी, इनपुट डीलर्स, उद्योजक, विद्यार्थी, शासकीय आणि निमसरकारी विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये देशातील विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, विविध जिल्हास्तरीय विभाग - जसे की जिल्हा फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, नाबार्ड बँक, जिल्हा रेशीम विभाग, जिल्हा पाटबंधारे विभाग, महिला आणि बालविकास विभाग आदींकडून संबंधितांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत. या मेळ्यात कृषी तंत्रज्ञानाचे 50 हून अधिक प्रदर्शन स्टॉल तसेच गायी, शेळ्या यांच्या विविध प्रजाती आणि इतर प्राणी देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. आदिवासी भागातील पशुधन आणि शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगत जातीच्या प्राण्यांच्या सौंदर्य स्पर्धेबरोबरच पशु आरोग्य वैद्यकीय शिबिरेही आयोजित केली जात आहेत.
या मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषी आणि पशुसंवर्धन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक बाबींची माहिती व्हावी यासाठी शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद तसेच शेतकरी चर्चासत्रही आयोजित केले जात आहेत. या चर्चासत्रात शेती आणि पशुसंवर्धनाशी संबंधित प्रश्नांची आणि अडचणींची द्रुत निराकरणे सादर केली जात आहेत.
***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013084)
Visitor Counter : 99