आयुष मंत्रालय

आयुर्वेदाच्या मदतीने किशोरवयीन मुलींच्या पोषणात सुधारणा करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय आले एकत्र


आयुर्वेदाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींमधील अ‍ॅनिमिया नियंत्रणासाठी दोन्ही मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार, पाच राज्यांमधील पाच आकांक्षी जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य उपक्रम राबवण्यात येणार, गडचिरोलीचा समावेश

Posted On: 26 FEB 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2024

 

आयुष मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयुर्वेदाच्या मदतीने किशोरवयीन मुलींच्या पोषणात सुधारणा करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे मिशन उत्कर्ष अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये आयुर्वेदिक उपायांचा वापर करून किशोरवयीन मुलींमधील अ‍ॅनिमिया नियंत्रणासाठी हा संयुक्त सार्वजनिक आरोग्य उपक्रम सुरु करण्यात आला . या सामंजस्य करारावर केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय महिला आणि  बालविकास मंत्री स्मृती इराणी  यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात, आसाम-धुबरी, छत्तीसगड- बस्तर; झारखंड – पश्चिमी  सिंगभूम; महाराष्ट्र – गडचिरोली; राजस्थान - धौलपूर या पाच राज्यांतील पाच आकांक्षी जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलींची (14-18 वर्षे) अ‍ॅनिमिया स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय दोन्ही मंत्रालयांनी संयुक्तपणे घेतला.

आयुष मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आज अ‍ॅनिमिया प्रवण जिल्ह्यांमधील (जिथे ॲनिमियाचे सरासरी प्रमाण सुमारे 69.5% आहे) सुमारे 95,000 किशोरवयीन मुलींचे पोषण सुधारण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार केला. पाच जिल्ह्यांमधील सुमारे 10,000 अंगणवाडी केंद्रांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल.

उपस्थितांना संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, दोन्ही मंत्रालये भारताला ॲनिमियामुक्त करण्यासाठी एकत्र येत आहेत. ‘ॲनिमिया मुक्त भारत’  चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आयसीएमआर सारख्या संस्थांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या मदतीने आयुष प्रणालीचा वापर केल्यामुळे अ‍ॅनिमियाचा सामना करण्यासाठी किफायतशीर उपाय उपलब्ध होतील , जे आतापर्यंत जगाला माहीत नव्हते यावर  स्मृती इराणी यांनी यावेळी भर दिला.

सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (सीसीआरएएस)  या संस्थेचा या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. क्लिनिकल चाचण्या घेण्यासोबतच, सार्वजनिक आरोग्य उपक्रम उदा. आयुर्वेदाच्या माध्यमातून अ‍ॅनिमिया नियंत्रणावरील राष्ट्रीय मोहीम देशातील 13 राज्यांमधील 323 आरोग्य केंद्रांवर आयोजित करण्यात आली  आणि; गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीपूर्व घ्यावयाच्या काळजीसाठी (गर्भिणी परिचर्या) हिमोग्लोबिन पातळीतील बदलासह आयुर्वेदिक उपायांच्या परिणामकारकतेबाबत एक बहु-स्तरीय अभ्यास सीसीआरएएस द्वारे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009258) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi