संरक्षण मंत्रालय

लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 ला भेट दिली

Posted On: 26 FEB 2024 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2024

 

देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज, 26 फेब्रुवारी 2024 रोजी  पुण्यात मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन  केंद्र येथे आयोजित महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्रविषयक एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) एक्स्पो 2024 या प्रदर्शनाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई उद्योग, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ)च्या प्रयोगशाळा तसेच  संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम (डीपीएसयू) यांच्यातर्फे विकसित स्वदेशी क्षमता आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवण्यात आले आहे.

याप्रसंगी जनरल मनोज पांडे यांनी एमएसएमई उद्योगांचे संचालक तसेच विद्यार्थी यांना उद्देशून बीजभाषण केले आणि ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यात महत्त्वाचे योगदान देणारे राज्य असल्याबद्दल महाराष्ट्राला श्रेय दिलेच पाहिजे.  संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे, देशातील पहिले राज्य होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्र राज्याने हवाई उड्डाण तसेच संरक्षण विषयक उत्पादनाला प्रोत्साहन  योजनेतील पॅकेज मधील महत्त्वाचे विषय म्हणून देखील घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये 20% हून अधिक  तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या एकूण साठ्यापैकी 30% साठ्याच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र राज्य देत आहे. ही आकडेवारी  संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शवते.

भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीवर अधिक भर देत लष्कर प्रमुख म्हणाले की देशात आता अधिक ग्राहकविषयक विपुलता, अधिक उत्तम जीवनशैली, अधिक प्रमाणात साक्षर झालेला वर्ग आणि नागरिकांच्या आकांक्षा उंचावलेल्या दिसत आहेत. धोरणात्मक सुधारणा, कौशल्य मिळवण्यासाठीचे उपक्रम, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, डिजिटल क्षमता, आघाडीची उद्योजकता यांच्या बाबतीत सरकारी संस्था तसेच सशस्त्र दलांनी उचललेल्या पावलांची त्यांनी प्रशंसा केली आणि ते म्हणाले की यातून शाश्वत विकासाप्रती तसेच पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागधारक होण्याप्रती देशाची वचनबद्धता दिसून येते.

“आपल्या क्षमतेच्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून,भारतीय लष्कराने एमएसएमई उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग परिसंस्था या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे  त्यांनी नमूद केले.

संरक्षण उत्कृष्टता (iDEX) खरेदी प्रक्रियेअंतर्गत, सर्व प्रकल्प स्टार्ट अप्स उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करणे अनिवार्य आहे, असेही  लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.

सध्या iDEX अंतर्गत भारतीय लष्कराचे 400 कोटी रुपये किंमतीचे 55 प्रकल्प निर्माणाधीन अवस्थेत असून यासाठी एकूण 65 स्टार्ट अप्स उपक्रम काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष युद्ध भूमीतील वापरासाठी मर्यादित प्रमाणात उपकरणे खरेदी करण्यासाठी 70 कोटी रुपयांचे चार करार झाले आहेत. असे ते म्हणाले.

लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्कराच्या अभिनव कल्पना आणि नवोन्मेष  उपक्रमाचा उल्लेख केला आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)वर आधारित जनरेटर संरक्षण प्रणाली विद्युत रक्षक आणि जैव वैद्यकीय उपकरण या दोन  नवीन कल्पनांची आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उद्योगांना  हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

भारतीय लष्कराने  नवोन्मेषाला प्रोत्साहन  देण्यासाठी उद्योगाच्या सहकार्याने विकसित केलेल्या उत्पादनांसाठी बौद्धिक संपदा अधिकारांचा पाठपुरावा करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय लष्कराने आतापर्यंत 66 बौद्धिक संपदा अधिकारांसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 13 पेटंट, 05 कॉपीराइट आणि 05 डिझाइन नोंदणी मंजूर करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

लष्करप्रमुखांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योग प्रमुखांशी देखील संवाद साधला आणि त्यांनी त्यांची उत्पादने आणि सेवा, भारतीय लष्कराच्या भविष्यातील गरजांनुसार निर्माण कराव्यात यासाठी प्रोत्साहित केले. तसेच आत्मनिर्भरता या संकल्पनेला साकारण्यासाठी  वचनबद्धता दर्शवून उदयोन्मुख भारताच्या आकांक्षा, ध्येय आणि उद्दिष्ट पूर्तीमध्ये एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन  केले.

 

* * *

M.Iyengar/Sanjana/Bhakti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009129) Visitor Counter : 79


Read this release in: English , Urdu , Hindi