ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक व्यवहार विभागाने भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या सहयोगाने "ब्रँड विस्तार विरुद्ध सरोगेट जाहिराती – फरक काय?" या विषयावर आयोजित केली भागधारकांची बैठक


प्रतिबंधित श्रेणींमधील उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या सरोगेट जाहिराती ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करतात: ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह

सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक हक्कांचे रक्षण करण्याच्या व्यापक उद्दिष्टासह सरोगेट जाहिराती, ब्रँड विस्तार आणि ट्रेडमार्क निर्बंधांबाबतच्या गुंतागुंतीच्या समस्यांचे एकत्रितपणे निराकरण करण्याचे बैठकीचे उद्दिष्ट

Posted On: 22 FEB 2024 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2024

 

ग्राहक व्यवहार विभागाने (DoCA) भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या सहयोगाने आज मुंबईत, "ब्रँड विस्तार विरुद्ध सरोगेट जाहिराती – फरक काय?"  या विषयावर सल्लामसलत करण्यासाठी भागधारकांची बैठक आयोजित केली होती. 

सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक हक्कांचे रक्षण करण्याच्या व्यापक उद्दिष्टासह सरोगेट जाहिराती, ब्रँड विस्तार आणि ट्रेडमार्क निर्बंधांबाबतच्या गुंतागुंतीच्या समस्यांचे एकत्रितपणे निराकरण करणे, हे या सल्लामसलत बैठकीचे उद्दिष्ट होते.

या सल्लामसलत बैठकीला केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळ (CBFC), माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) आणि ट्रेडमार्क प्राधिकरण यासह सरकारी संस्थांचे प्रमुख भागधारक सहभागी झाले होते. त्यांनी अशा सरोगेट जाहिरातींचे नियमन कसे करावे यावर आपले विचार मांडले.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले की, प्रतिबंधित श्रेणींमधील  उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या सरोगेट जाहिराती ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करतात आणि त्याचे  गंभीर परिणाम संभवतात. उद्योगांमध्ये सरोगेट जाहिरातींच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्याची अत्यंत गरज आहे. संबंधित प्रतिबंधित उद्योगांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आणि विद्यमान कायद्यांचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले, तर अधिक कठोर कारवाईची अंमलबजावणी केली जाईल.

नव्याने उद्भवणाऱ्या या समस्येचे निराकरण करताना सर्व भागधारकांच्या सहकार्याने काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सरोगेट जाहिरातींमधील सततचा सहभाग माफ केला जाणार नाही, या आपल्या भूमिकेचा ग्राहक व्यवहार विभागाने स्पष्ट पुनरुच्चार केला.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्याच्या दृढ वचनबद्धतेसह, नियमांचे पालन न करण्याच्या कोणत्याही घटनांचे निराकरण करण्यासाठी कठोर उपाययोजना अमलात आणल्या जातील, हे अधोरेखित करण्यात आले.

सल्लामसलत बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:

  • ब्रँड विस्तार आणि प्रतिबंधित उत्पादन अथवा सेवेची जाहिरात यामधील फरक स्पष्ट असावा:
  • जाहिरातीची कथा अथवा व्हिज्युअलमध्ये केवळ जाहिरात केल्या जाणाऱ्या उत्पादनाचे चित्रण असावे, आणि कोणत्याही स्वरूपात प्रतिबंधित उत्पादनाचे चित्रण नसावे.
  • जाहिरातीमध्ये प्रतिबंधित उत्पादनांचा कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संदर्भ नसावा.
  • जाहिरातीमध्ये प्रतिबंधित उत्पादनांचा प्रचार करणारे कोणतेही तपशील अथवा वाक्ये नसावीत.
  • जाहिरातीमध्ये प्रतिबंधित उत्पादनांशी संबंधित रंग, मांडणी अथवा सादरीकरणाचा  वापर नसावा.
  • इतर उत्पादनांची जाहिरात करताना जाहिरातींनी प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिरातीसाठी विशिष्ट परिस्थितीचा वापर करू नये.

सल्लामसलत बैठकीत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या समर्थनाला प्रतिबंध करण्यासाठी 2022 मध्ये लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. उद्योगातील भागधारक, नियामक संस्था आणि तज्ञांना सरोगेट जाहिरातींविरोधात प्रभावी धोरणे आखता यावीत, यासाठी सरोगेट जाहिरातींची अचूक व्याख्या तयार करण्यात आली. या चर्चेमध्ये पारदर्शकता वाढवणे, अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे आणि जबाबदार जाहिरात पद्धतींना प्रोत्साहन देणे, या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2008215) Visitor Counter : 88


Read this release in: English , Urdu , Hindi