पर्यटन मंत्रालय
"आदरातिथ्य क्षेत्राचे भविष्य पूर्वीपेक्षा उज्वल, भरीव आणि भव्य": आयएचएम मुंबईच्या अमृत महोत्सवी समारंभात अमिताभ कांत यांचे प्रतिपादन
Posted On:
17 FEB 2024 10:36PM by PIB Mumbai
मुंबई, 17 फेब्रुवारी 2024
आयएचएम मुंबई या नावाने सुपरिचित असणाऱ्या इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रीशन मुंबई या संस्थेने आज मुंबईत आपला अमृत महोत्सव साजरा केला. भारताचे जी-20 शेर्पा अमिताभ कांत या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2047 सालापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.
SS4O.jpeg)
अमिताभ कांत म्हणाले की भारतात नुकत्याच झालेल्या जी-20 परिषदेने सांस्कृतिक शक्तीस्थान आणि अस्सल अनुभव देणारे प्रभावी स्थान म्हणून भारताची प्रतिमा उजळली आहे. 2027 सालापर्यंत भारत जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत असताना, जागतिक स्तरावर भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे आदरातिथ्य क्षेत्रासाठी अधिक संधी आणि जबाबदाऱ्याही उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. 2022-23 या वर्षात 60 भारतीय शहरांमध्ये जी-20 परिषदांचे आयोजन केल्यामुळे कोविड नंतरच्या पर्यटनाला चालना मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आयएचएम, मुंबईचे योगदान आणि भविष्यातील भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की आयएचएम ही संस्था नवीन आणि अनंत शक्यतांच्या महत्वपूर्ण टप्प्यावर उभी आहे. अमृतकाळाचे पुढील 30 वर्षांचे नियोजन संस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण 2047 सालापर्यंत भारत जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 30 टक्के योगदान देईल, असे ते म्हणाले. आदरातिथ्य उद्योगात मुख्य व्यवस्थापक आणि उद्योग प्रमुखपदी युवा वर्गाची संख्या लक्षणीय असल्याबद्दल, आणि त्यापैकी जास्तीत जास्त जण आयएचएम मधील असल्याबद्दल अमिताभ कांत यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सचिव आणि आयएचएम मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा जयश्री भोज, आयटीसी हॉटेल्सचे माजी कार्यकारी संचालक नकुल आनंद आणि 1970 पासूनच्या विविध तुकड्यांमधील अनेक उल्लेखनीय माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
2PKL.jpeg)
आयएचएम मुंबईचा इतिहास आणि या संस्थेचे योगदान, भारताच्या आदरातिथ्य क्षेत्राला आकार देण्याच्या आणि या क्षेत्राला नवीन क्षितिजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पुरक असल्याचे, श्रीमती भोज यांनी यावेळी सांगितले. संस्थेचा विकास आणि आदरातिथ्य क्षेत्रातील योगदानाबद्दल परम कानमपिल्ली, सोनल हॉलंड, अडवाणी, सी. व्ही. रवींद्रनाथ, कमलेश बारोट, शीला वासन सिंगला, कैनाज मेसमन अशा अनेक नामवंत माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
* * *
PIB Mumbai | M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006854)
अभ्यागत कक्ष : 89