Posted On:
10 FEB 2024 1:00PM by PIB Mumbai
"नाजूक 5" ते "अव्वल 5" अर्थव्यवस्थेपर्यंतचा गेल्या दहा वर्षांचा भारताचा हा प्रवास एक संशोधनाचा विषय आहे, जो अर्थशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आकर्षित आणि उत्साही करेल असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
भूतकाळातील उपहासवृत्ती आणि घोटाळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील दशक हे संदिग्ध वेगळेपण जाणून घेण्याची संधी असून निराशावादाकडून आशावादाकडे प्रवासाची ही सुरुवात आहे, असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री नवी दिल्लीत टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ‘द बिग शिफ्ट – मेजरिंग द फोर्सेस ऑफ चेंज’ या जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत भारताने विविध जागतिक मापदंड आणि सार्वत्रिक मानकांमध्ये वेगाने वाढ केली आहे असे सिंह म्हणाले. .
आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे आणि जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आपण 2014 मध्ये 81 व्या क्रमांकावर होतो, आपण 41 स्थानांनी झेप घेतली असून आज आपण जगात 40 व्या क्रमांकावर आहोत, असे ते म्हणाले.
भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे आणि इथे सर्वात वेगाने वाढणारे युनिकॉर्न आहेत, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
2014 मध्ये भारतात केवळ 350 स्टार्टअप्स होते, आज त्यात 300 पटीने वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया' अशी घोषणा दिल्यानंतर आणि 2016 मध्ये विशेष स्टार्टअप योजना आणल्यानंतर, आज आपल्याकडे 1,30,000 स्टार्टअप्स आहेत, आणि 110 हून अधिक युनिकॉर्न आहेत,” असे ते म्हणाले.
देशात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती, मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षम वातावरण तयार झाले, असे सिंह म्हणाले.
“पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे भारताचे अंतराळ क्षेत्र खुले झाल्यामुळे , सामान्य जनतेला चांद्रयान-3 आणि आदित्य सारख्या प्रमुख अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होता आले ,” असे ते म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, चार-पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे अंतराळ क्षेत्रात फक्त एक स्टार्टअप होता, आज हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे सुमारे 190 खाजगी स्पेस स्टार्टअप्स आहेत तर याआधीचे स्टार्टअप आता उद्योजक बनले आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत खाजगी स्पेस स्टार्टअप्सनी 1,000 कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे असे ते म्हणाले.
आपला अंतराळ संशोधन कार्यक्रम 1969 साली सुरू झाला , ज्या वर्षी अमेरिकेने चंद्रावर प्रथमच मानवाला उतरवले होते. मात्र त्यानंतर आपण अंतराळ क्षेत्रातील प्रमुख राष्ट्रांच्या बरोबरीने आपली कामगिरी उंचावली. आणि गेल्या वर्षी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अलगदपणे उतरून इतिहास घडवला , जेथे यापूर्वी कोणीही उतरले नाही.
भारताच्या भविष्यातील आर्थिक वाढीला जैवतंत्रज्ञान चालना देईल असे सांगत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, सध्या आपल्या जैव-अर्थव्यवस्थेचे मूल्य जवळपास 140 अब्ज डॉलर्स आहे जे एक दशकापूर्वी10 अब्ज डॉलर्स होते. आज देशात 6,300 पेक्षा जास्त बायोटेक स्टार्टअप्स आणि 3,000 हून अधिक ॲग्रीटेक स्टार्टअप आहेत असे ते म्हणाले.
“आपल्याकडे भारतात विपुल जैव संसाधने आहेत, - हिमालयात, वनौषधी, अरोमा मिशन नवीन संधी निर्माण करत आहे तर 7,500 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या किनारपट्टीवर समुद्रातील प्रचंड संपत्तीचा वापर करण्यासाठी डीप ओशन मिशन सुरू करण्यात आले आहे,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
"अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन" वैज्ञानिक संशोधनात मोठ्या सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचा मार्ग मोकळा करेल असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की एनआरएफ हे अमेरिकेच्या एनआरएफपेक्षा चांगले मॉडेल असेल.
“एनआरएफ तरतुदीत पाच वर्षांत 50,000 कोटी रुपये निधी उभा राहील अशी अपेक्षा आहे , त्यापैकी सुमारे 60%-70%, बिगर -सरकारी स्त्रोतांकडून येण्याचा अंदाज आहे,” असे ते म्हणाले.
एककेंद्रीपणाचा काळ आता संपला आहे याचा पुनरुच्चार करत, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, एनआरएफ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील एकात्मतेला चालना देईल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या शिफारशींनुसार देशात वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करेल.
नवोन्मेषक, संशोधन आणि विकास आणि स्टार्टअपसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग्य परिसंस्था दिली आहे जी नवोन्मेषाला पूरक आहे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि उद्योगाच्या भरभराटीला अनुकूल आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील आपण स्वत:हून लादलेल्या बेड्यांपासून आपली सुटका केल्याचा उल्लेख करून, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की सरकारने सुमारे 2,000 जुने कायदे रद्द केले आणि अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त केली, जे पूर्वी थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि वाढीला चालना देण्यासाठी हानिकारक ठरले होते.
आज जग भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे,असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, हरित ऊर्जा आणि शून्य उत्सर्जन आणि गेल्या वर्षी जी 20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन आघाडी सुरु करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे आपण हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाला अधिक बळ देत आहोत.
जग आज भारताकडे नेतृत्वाच्या आशेने पाहत आहे असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, आजचे युवक हे पंतप्रधान मोदींच्या "विकसित भारत" @2047चे शिल्पकार असतील.
***
H.Akude/S.Kane/P.Kor