वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या धोरणांना आकार देण्यासाठी तसेच योजनेची परिणामकारकता वाढविण्यासाठी विधायक अभिप्राय आणि सहयोगी सहभागाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले प्रोत्साहन
व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही फायदे मिळतील याची सुनिश्चिती करत उच्च दर्जाच्या वस्तूंच्या उत्पादनाच्या महत्त्वावर गोयल यांनी दिला भर
Posted On:
04 FEB 2024 2:48PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेची धोरणे आणि कार्यपद्धती यांना आकार देण्यासाठी तसेच या योजनेची परिणामकारकता वाढविण्यासाठी उद्योगांचे रचनात्मक अभिप्राय आणि सहयोगी सहभागाला प्रोत्साहन दिले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे काल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाने आयोजित केलेल्या 'उत्पन्न आधारित प्रोत्साहन योजना दृष्टिकोन : हितसंबंधींची बैठक' या कार्यक्रमात बीज भाषण देत होते. यावेळी गोयल यांनी भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
गोयल यांनी उद्योगातील मातब्बर व्यक्तींना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. स्पर्धात्मकतेमुळे व्यवसायाचे वातावरण जोपासण्यासाठी नवकल्पना, कार्यक्षमता आणि अनुकूलता यांना चालना मिळते, असेही ते म्हणाले. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या वस्तूंच्या उत्पादनाला प्राधान्य देण्यावर उद्योगांनी आपले लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. याचे फायदे व्यवसाय क्षेत्र आणि ग्राहक या दोघांना मिळतील असे त्यांनी सांगितले.
योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्रालय आणि विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांशी नियमित सल्लामसलत केली पाहिजे आणि गोलमेज बैठक आयोजित केली पाहिजे, असेही गोयल यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनांच्या एकूण उपलब्धतेवरही चर्चा करण्यात आली. आजवर वास्तविक गुंतवणूकीच्या रुपात 1.07 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत (डिसेंबर' 23 पर्यंत) ज्यामुळे 8.70 लाख कोटी रुपये मूल्याचे उत्पादन किंवा विक्री झाली असून सुमारे 7 लाख रोजगार निर्मिती (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधून भरीव योगदानामुळे निर्यात 3.40 लाख कोटी रुपयांच्या वर गेली आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेंतर्गत 8 क्षेत्रांसाठी सुमारे 4,415 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरित करण्यात आली आहे.
परस्परसंवादी सत्रांदरम्यान, लाभार्थी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उत्पन्न आधारित प्रोत्साहन योजनांबद्दल आपले दृष्टीकोन आणि अनुभव तसेच त्यांच्या समोर आलेली आव्हाने सामायिक केली आणि या योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी तसेच अंमलबजावणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी सुधारणा करण्याच्या सूचनांबद्दल मौल्यवान दृष्टीकोन सामायिक केला.
सर्व भागधारकांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे, ज्ञान आणि अनुभव तसेच उत्तम पद्धती आणि यशोगाथा यांची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी मालकीची भावना वाढवणे हा या बैठकीचा उद्देश होता. या सर्वांचा परिणाम म्हणून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे सुलभ होईल.
उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत 14 क्षेत्रातील लाभार्थी कंपन्यांमधील सुमारे 1200 प्रतिनिधी, या योजनेच्या प्रभावी आणि सुरळीत अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यासाठी आणि धोरण तयार करण्यासाठी एकत्र आले.
सर्व सहभागींच्या उत्पन्न आधारित प्रोत्साहन योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध प्रोत्साहनांचा त्यांच्या पूर्ण मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त वापर करण्याच्या संयुक्त वचनबद्धतेनंतर बैठकीचा समारोप झाला.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002427)
Visitor Counter : 116