संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस सन्धायक, हे भारतातील पहिले विशाल टेहळणी जहाज, विशाखापट्टणम इथे, संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समाविष्ट


हे जहाज, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात, एक महाशक्ती म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करेल: राजनाथ सिंह

“आयएनएस सन्धायक आपल्या आणि आपल्या मित्र देशांच्याही सागरी हितसंबंधांचे संरक्षण करेल.”

“सागरी चाचेगिरी आणि तस्करी खपवून घेतली जाणार नाही, हा नव्या भारताचा संकल्प आहे.”

“भारत नौवहन, व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य, तसेच नियम आधारित व्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता”

Posted On: 03 FEB 2024 1:45PM by PIB Mumbai

 

आयएनएस सन्धायक (यार्ड 3025) ही देशातील पहिलीच टेहळणी विशाल युद्धनौका आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा नेत्रदीपक राष्ट्रार्पण सोहळा झाला. या युद्धनौकेची प्राथमिक जबाबदारी, सुरक्षित सागरी नौवहन सक्षम करण्यासाठी बंदरे, नौवहन खाड्या/मार्ग, किनारपट्टीचे भाग आणि खोल समुद्र यांचे सर्वंकष हायड्रोग्राफिक (जलविज्ञान) सर्वेक्षण करणे ही असेल. तर, इतर दुय्यम कामगिरीसाठी हे जहाज नौदलाच्या विविध मोहिमा पार पाडण्यास सक्षम असेल.

या टेहळणी युद्धनौकेचा, नौदलाच्या ताफ्यात समावेश होणे, की एक ऐतिहासिक घटना असून, त्यातून, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात, महशक्ती म्हणून भारताची भूमिका अधिकच मजबूत होण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला असून या संपूर्ण क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा अबाधित राखण्यात भारतीय नौदलाला मदत होईल, असे संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले. मानवी विकासाशी तुलना करून, संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या सुरक्षेचा पैलू समजावून सांगितला. ते म्हणाले, “एक मूल जन्माला आल्यावर सगळ्या गोष्टींसाठी आपल्या कुटुंबावर अवलंबून असते. हळूहळू, ते स्वतंत्र होते, आणि त्यानंतर ते समाजात त्याचे/तिचे ज्ञान वाटायला सुरूवात करते. त्याचप्रमाणे एखादा देश, आपल्या विकासाच्या प्राथमिक पातळीवर, संरक्षणासाठी, इतर देशांवर अवलंबून असतो. मात्र, नंतर त्याचा विकास होत असतांना तो आपल्या संरक्षण क्षमताही निर्माण करतो. त्यानंतर अशी तिसरी अवस्था येते, जेव्हा, एखादे राष्ट्र इतके शक्तिशाली बनते, की ते केवळ स्वत:च्याच नाही, तर आपल्या मित्र देशांच्या हितसंबंधांचेही रक्षण करु शकते.

आयएनएस सन्धायकच्या या राष्ट्रार्पण प्रसंगी, संरक्षण मंत्र्यांनी, केवळ भारतीय युद्धनौकाच नव्हे, तर मित्र देशांच्या नौकांचे रक्षण करण्याइतकी क्षमता निर्माण केल्याबद्दल, भारतीय नौदलाची प्रशंसा केली. अलीकडेच, एडनच्या आखातात ब्रिटीश जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा संदर्भ देत, या हल्ल्यामुळे, तेलाच्या टँकरना लागलेली  आग विझवण्यासाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले.

त्याशिवाय, समुद्री चाचेगिरीचे पाच प्रयत्न हाणून पाडत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलेल्या जहाजांना मदत केल्याबद्दल तसेच, 80 मच्छीमार/नौसैनिकांना वाचवण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. "हिंद महासागर प्रदेशातील भारतीय नौदल, शांतता आणि समृद्धी कायम राहील, याची व्यवस्था करत, सुरक्षित व्यापार सुलभ करत आहे. अनेक संरक्षण तज्ज्ञ यालाच महासत्तेचा उदय म्हणत आहेत. प्रत्येकाचे संरक्षण करणे ही आपली संस्कृतीच आहे ", असे ते म्हणाले.

आपले सामर्थ्य वाढवत असतांनाच, केवळ या प्रदेशातीलच नाही, तर संपूर्ण जगातील अराजकतेचे समूळ उच्चाटन करण्याचा भारताचा निश्चय आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. विविध देशांना, नौवहन, व्यापार आणि वाणिज्य याचे स्वातंत्र्य अबाधितपणे मिळावे, अशीच भारताची भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या वाढत्या महाशक्तीचा हेतू, एक नियम-आधारित व्यवस्था प्रस्थापित करणे हा आहे. हिंद महासागर आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात होणारी अवैध आणि अनिर्बंध मासेमारी रोखणे, हा आपला उद्देश आहे. आपले नौदल, या परदेशातून होणारी अमली पदार्थ आणि मानवी तस्करी थांबवत आहे. केवळ चाचेगिरी रोखणे नाही, तर या संपूर्ण प्रदेशात,शांतता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आयएनएस सन्धायक, हे उद्दिष्ट साध्य करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल. ज्या हेतूने सरकार नौदलाला बळकट करत आहे, त्यामुळे जागतिक शांततेचे खंदे पुरस्कर्ते बनण्याचा आपला संकल्प, प्रत्यक्षात साकार होईल", असे राजनाथ सिंह म्हणाले.

या प्रसंगी बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार म्हणाले की, एसव्हीएल प्रकल्प सरकार आणि नौदलाने समुद्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वअट - म्हणजे महासागरांच्या अथांग खोलीचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला दिलेले वाढते महत्त्व अधोरेखित करते.  विविध प्रकारच्या भूमिका आणि कार्ये करण्यासाठी लवचिकतेचा लाभ घेण्यासाठी नौदल स्वदेशी स्तरावर अत्याधुनिक व्यासपीठ सुरू करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका विक्रांत असो, विशाखापट्टणम श्रेणीतील घातक विनाशक नौका असोत, अष्टपैलू निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स असोत, कलवरी श्रेणीतील चपळ पाणबुड्या असोत, उथळ पाण्यात प्रभावी काम करणाऱ्या चपळ शॅलो वॉटर एएसडब्ल्यू क्राफ्ट असोत किंवा विशेष डायव्हिंग सपोर्ट नौका असोत, याद्वारे प्रगतीपथावर अग्रेसर होत असलेल्या भारताच्या सेवेसाठी आम्ही अत्यंत काळजीपूर्वक एक संतुलित 'आत्मनिर्भर' सेना तयार करत आहोत, असे ते म्हणाले.

भारतीय नौदलाला आवश्यक असलेली 66 पैकी 64 जहाजे आणि पाणबुड्या भारतीय शिपयार्डमध्ये तयार केल्या जात आहेत, असे ॲडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितले.  याचाच अर्थ नौदल या क्षेत्रात हजारो कोटींची गुंतवणूक करेल, शिपयार्ड्सची क्षमता आणि कामगार तसेच सहायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांची क्षमता वाढवेल, यावर त्यांनी भर दिला.

हिंदी महासागरातील शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, या संरक्षण मंत्र्यांच्या आश्वासनाचा उल्लेख करून नौदल प्रमुख म्हणाले: केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाने गेल्या चार पाच आठवड्यात महिन्यांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्देशांचा परिणाम पाहिला आहे.  जोपर्यंत हिंदी महासागर पूर्णपणे मोकळा, सुरक्षित आणि मुक्त होत नाही तोपर्यंत भारतीय नौदल थांबणार नाही. आम्ही तयार आहोत!".

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE), कोलकाता येथे बांधकामाधीन असलेल्या एसव्हीएल प्रकल्पाच्या चार जहाजांपैकी पहिल्या जहाजाचा औपचारिक समारंभा द्वारे नौदलात समावेश झाला.  या प्रकल्पाचे संचालन भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने केले आहे.

12 मार्च 2019 रोजी या जहाज उभारणीचा प्रारंभ करण्यात आला होता आणि 05 डिसेंबर 2021 रोजी हे जहाज नौदलात दाखल करण्यात आले होते. या जहाजाच्या बंदरात आणि समुद्रात अनेक प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतरच त्याला नौदलात दाखल करण्यात आले. जहाजाचे वजन 3,400 टन असून एकूण लांबी 110 मीटर आहे तर रुंदी 16 मीटर आहे.

आयएनएस सन्धायक अत्याधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणांसह सुसज्ज आहे ज्यामध्ये डीप आणि शॅलो वॉटर मल्टी-बीम इको-साउंडर्स, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल, रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल, साइड स्कॅन सोनार, डेटा ॲक्विझिशन आणि प्रोसेसिंग सिस्टम, सॅटेलाइट-आधारित पोझिशनिंग सिस्टम तसेच स्थलीय सर्वेक्षण उपकरणे यांचा समावेश आहे. हे जहाज दोन डिझेल इंजिनद्वारे हाकारले जाते आणि ते 18 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे.  या जहाजाच्या एकूण किमतीपैकी 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असून भारतीय नौदल तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी देखील याच्या उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नौदलात या जहाजाचा समावेश देशाच्या वाढत्या सागरी हितसंबंधांना आणि क्षमतांना अधोरेखित करतो.

सन्धायकम्हणजे जो विशेष शोध घेतो तो.  या जहाजाच्या शीर्ष भागातील क्रेस्टमध्ये नाविकांच्या होकायंत्राचे सोळा बिंदू दर्शवले आहेत तर त्याच्या मध्यभागी समुद्रावर सफर करताना आवश्यक असणारा डिव्हायडरआणि अँकरआहे, हे चिन्ह महासागरांच्या मोजमापाचे प्रतीक आहे, आणि हीच सर्वेक्षण जहाजाची मूलभूत भूमिका आहे. या जहाजाचे राष्ट्रार्पण हे युद्धनौका रचना आणि बांधणीतील भारताच्या कौशल्याची पुष्टी करते

***

S.Patil/R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2002338) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi