Posted On:
02 FEB 2024 5:37PM by PIB Mumbai
लडाखमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024, चे आज नवांग दोरजे स्तोबदान स्टेडियममध्ये संगीतमय वातावरणात उद्घाटन झाले. पाच दिवस चालणार्या या स्पर्धेत, पंधरा राज्ये आणि दोन सरकारी संस्था आइस हॉकी आणि आइस-स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेत आहेत. लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर. (डॉ.) बी.डी. मिश्रा (निवृत्त) यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे आयोजित केला जाणार आहे.
लडाखसाठी हा दिवस खास असून, त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 च्या आयोजकांसाठी एक विशेष संदेश पाठवला आहे.
आपल्या प्रेरणादायी निवेदनात पंतप्रधान मोदी यांनी, खेलो इंडिया भारताला कसे एकत्र आणत आहे, हे सांगितले आहे. “तामिळनाडूमध्ये यशस्वीपणे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धा आपण नुकत्याच पहिल्या, दक्षिणेकडून उत्तरेकडील टोकापर्यंत, खेलो इंडियाचा प्रवास आणि त्याची ऊर्जा अखंड सुरू आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा ही भावना वृद्धिंगत करत असून, चॅम्पियन्स घडवण्याच्या, तसेच जम्मू, काश्मीर आणि लडाख या प्रदेशाला जागतिक स्तरावरील हिवाळी क्रीडा स्पर्धांचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाला बळ देत आहे.” पंतप्रधान म्हणाले.
लडाख या केंद्रशासित प्रदेशात आता खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र) असेल. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि लडाख केंद्रशासित प्रदेश क्रीडा विभाग यांच्यात शुक्रवारी याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करणाऱ्या केंद्रशासित प्रदेशासाठी ही एक उत्तम भेट होती.
लडाखमधील खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्र या खडतर प्रदेशातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन देईल. हे केंद्र ॲथलेटिक्स, तिरंदाजी आणि मुष्टियुद्ध या तीन खेळांना सेवा देईल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या, लडाखमधील प्रतिभांना प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ मिश्रा म्हणाले, “हा करार या भागातील खेळाडूंना योग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांना आपला दर्जा सुधारण्यासाठी उपयोगी ठरेल. आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, अशी आपली नेहमीच इच्छा असते. लडाखच्या क्रीडा इतिहासातील हा निश्चितच महत्वाचा टप्पा आहे.”
एनडीएस स्टेडीयममध्ये सादर झालेली पारंपरिक लोकनृत्ये पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यांना डॅशहग्स या लोकप्रिय स्थानिक वाद्यवृंदाने सादर केलेले आणि पावले थिरकायला लावणारे संगीत ऐकायला मिळाले. केंद्रशासित प्रदेश-लडाख आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्यातील प्रदर्शनीय आईस-हॉकी सामन्याने या स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. हा सामना शून्य-शून्य असा बरोबरीत संपला. देशभरातून आलेल्या मुलींच्या संघाने सादर केलेले चित्तथरारक 500 मीटर शॉर्ट-ट्रॅक आईस स्केटिंग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले.
पहिल्या दिवशी खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा 2024 मधील पहिली काही पदके देखील जाहीर झाली. उत्तर प्रदेशातून आलेला एकलव्य जागल याने 17 वर्षांखालील मुलांच्या शॉर्ट-ट्रॅक (300 मीटर) स्केटिंग प्रकारातील सुवर्णपदक पटकावले. त्याने 31.81 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. आरव पटवर्धन (32.03) दुसऱ्या स्थानी आणि अद्वय कोठारी (32.60) तिसऱ्या स्थानी राहिला. हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
17 वर्षांवरील मुलांच्या शॉर्ट-ट्रॅक स्केटिंग प्रकारात कर्नाटकचा आकाश आराध्य (32.81) सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राचे सुजॉय तापकीर (33.33) आणि सुमित तापकीर (32.81) हे खेळाडू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.
पुरुषांच्या आईस हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या आठ संघांनी तसेच महिलांच्या आईस हॉकी स्पर्धेत उतरलेल्या चार संघांनी देखील आज सामने खेळले. पुरुषांच्या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे तर महिलांचे संघ राऊंड-रॉबिन लीग प्रकाराने खेळणार आहेत.
खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा 2024 विषयी माहिती
खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा 2024 ही खेलो इंडिया वार्षिक स्पर्धांच्या आयोजनातील चौथी स्पर्धा आहे. यावर्षी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या सोबतीने लडाख हा केंद्रशासित प्रदेश पहिल्यांदाच या स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे. जम्मू आणि काश्मीरने वर्ष 2020 मधील खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावर्षीच्या स्पर्धांचा पहिला भाग म्हणजेच 2 ते 6 फेब्रुवारी या कालावधीतील स्पर्धा लेह येथे होणार आहेत. त्यानंतर 21 ते 25 फेब्रुवारी या काळात गुलमर्ग येथे या स्पर्धांचा उर्वरित भाग आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेतील आईस हॉकी आणि स्पीड स्केटिंग या खेळांचे आयोजन लडाख येथे करण्यात आले असून स्की माउंटेनियरींग, अल्पाईन स्कीईंग, स्नोबोर्डिंग, नॉर्डिक स्की आणि गंडोला या खेळांच्या आयोजनाची जबाबदारी जम्मू आणि काश्मीरवर सोपवण्यात आली आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेतून सुरु झालेल्या खेलो इंडिया अभियानाचा भाग आहेत. पंतप्रधानांचा प्रयत्न असा असतो की ऑलिम्पिकमध्ये आयोजित होणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळांना महत्त्व दिले जावे आणि क्रीडाविषयक उत्कृष्टतेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या देशातील प्रतिभावंत खेळाडूंच्या विकासासाठी योग्य मार्ग तयार करावे.
पदकतालिका पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://winter.kheloindia.gov.in/medal-tally
या स्पर्धांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://winter.kheloindia.gov.in/
***
S.Patil/R.Agashe/S.Chitnis/P.Kor