कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कोल इंडिया लिमिटेडच्या तीन सीएसआर उपक्रमांचे उद्‌घाटन

Posted On: 01 FEB 2024 12:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 31 जानेवारी, 2024 रोजी कोल इंडिया लिमिटेडने (सीआयएल), एज्युकेशनल कन्सल्टंट लिमिटेड (ईडीसीआयएल), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि टाटा स्ट्राइव्ह (TATA STRIVE) यांच्या सहयोगाने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) कार्यक्रमा अंतर्गत हाती घेतलेल्या तीन उपक्रमांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना, कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (ईडीसीआयएल) यांच्यात स्वाक्षरी झालेल्या या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट, कोळसा समृद्ध राज्यांमध्ये 12 वी पर्यंतच्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण प्रदान करणे, हे आहे. जवळजवळ 200 शाळांना याचा लाभ मिळणार असून, यासाठी सीएसआर अंतर्गत अंदाजे रु. 27.08 कोटी खर्च अपेक्षित आहे.

कोळसा खाण क्षेत्राच्या परिसरातील तरुणांना कौशल्य प्रदान करण्यासाठी, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) च्या प्रत्येक उपकंपनीमध्ये बहु-कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळा (एनएसडीसी) बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. 2024-25 मध्ये सेंट्रल कोल लिमिटेड (सीसीएल) आणि भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) मध्ये प्रायोगिक तत्त्वावर बहु-कौशल्य विकास संस्था कार्यान्वित केल्या जातील.

कोळसा खाण क्षेत्राच्या परिसरातील 655 बेरोजगार तरुणांना लाभदायक रोजगार मिळावा यासाठी, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने टाटा स्ट्राइव्ह बरोबर सामंजस्य करार केला आहे. यामध्ये  नागपूर, वाराणसी, कामरूप- आसाम आणि छिंदवाडा या चार केंद्रांमध्ये असिस्टंट इलेक्ट्रिशियन, कॉमी शेफ, F&B स्टीवर्ड, हाउसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस असोसिएट्स या क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी भारताचा विकास आणि समुदायांना सक्षम बनवण्यामध्ये जबाबदार भागीदार बनल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) प्रशंसा केली.

 

A.Chavan/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2001075)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu