पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक पाणथळ दिन 2024 (2 फेब्रुवारी) च्या पूर्वसंध्येला रामसर स्थळांच्या यादीत आणखी पाच पाणथळ जागांची भर घालत भारताने रामसर स्थळांची (आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागा) संख्या 80 पर्यंत वाढवली आहे -भूपेंद्र यादव
Posted On:
31 JAN 2024 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2024
जागतिक पाणथळ दिन 2024 च्या पूर्वसंध्येला , केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे की भारताने आणखी पाच पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून निश्चित करून रामसर स्थळांची (आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागा) संख्या सध्याच्या 75 वरून 80 वर नेली आहे. एका पोस्टमध्ये यादव म्हणाले की त्यांनी रामसर परिषदेचे सरचिटणीस डॉ. मुसोंदा मुंबा यांची भेट घेतली असता त्यांनी उपरोक्त पाच स्थळांचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
यादव म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिल्यामुळे देशातील पाणथळ जागांप्रती दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतील अमृत धरोहर उपक्रमात हे प्रतिबिंबित होते असे ते म्हणाले. रामसर स्थळांच्या यादीत आणखी भर घालणाऱ्या तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचे केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केले .
यापैकी तीन स्थळे, अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र , अघनाशिनी नदी आणि मागाडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटकात आहेत तर उर्वरित दोन, कराइवेट्टी पक्षी अभयारण्य आणि लाँगवुड शोला राखीव वन क्षेत्र तामिळनाडूमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांच्या यादीत या पाच पाणथळ स्थळांचा समावेश केल्यानेमुळे रामसर स्थळांच्या अंतर्गत समाविष्ट एकूण क्षेत्र आता 1.33 दशलक्ष हेक्टर इतके झाले आहे , ज्यात विद्यमान क्षेत्रापेक्षा (1.327 दशलक्ष हेक्टर) 5,523.87 हेक्टरची भर पडली आहे. तामिळनाडूने सर्वाधिक (16 स्थळे ) रामसर स्थळांच्या यादीत आपले स्थान कायम राखले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (10 स्थळे ) आहे.
इराणमधील रामसर येथे 1971 मध्ये पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ क्षेत्राबाबत हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक पाणथळ दिन 2024 ची संकल्पना 'पाणथळ जागा आणि मानवी कल्याण ' अशी आहे. आपले जीवन सुधारण्यात पाणथळ जागांची महत्त्वाची भूमिका, ही संकल्पना अधोरेखित करते. पूर संरक्षण, स्वच्छ पाणी, जैवविविधता आणि मनोरंजनाच्या संधी या मानवी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या बाबींमधील पाणथळ जागांचे योगदान यातून अधोरेखित होते.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000885)
Visitor Counter : 1089