आयुष मंत्रालय
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या विविध राज्यांतील योग शिक्षक आणि प्रशिक्षकांना विशेष निमंत्रण
Posted On:
25 JAN 2024 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
नवी दिल्लीत, कर्तव्यपथ इथे होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिन संचलन - 2024 चे साक्षीदार होण्यासाठी भारतातील विविध राज्यांतील योग शिक्षक आणि प्रशिक्षक विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारने, देशभरात सर्वदूर भागात देखील योगाद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 291 योग शिक्षक आणि प्रशिक्षकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे योग शिक्षक आणि प्रशिक्षक आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष मिशनच्या प्रमुख योजनेअंतर्गत कार्यरत आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र (AHWCs - आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स) मार्फत प्राथमिक आरोग्य सेवा आणि कल्याण केंद्रात कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर हे सर्व विशेष निमंत्रित केंद्रीय आयुष तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी संवाद साधतील.
आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्राशी (AHWC) संबंधित योग शिक्षक आणि प्रशिक्षक हे आयुष मंत्रालयाच्या प्राथमिक आरोग्य सेवा क्षेत्रात योगाद्वारे लोकांचे आरोग्यहित साधण्याच्या मोहिमेचा एक भाग आहेत. हे शिक्षक आणि प्रशिक्षक लोकांना केवळ योगासनांशी संबंधित आवश्यक प्रशिक्षणच देत नाहीत तर प्राथमिक आरोग्य सेवांच्या गरजांचीही काळजी घेतात. या सर्व शिक्षक आणि प्रशिक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. प्रजासत्ताक दिन संचलन 2024 हा कार्यक्रम आटोपल्यानंतर, हे विशेष निमंत्रित दिल्लीतील महत्त्वाच्या विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतील तसेच केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्यक्षेत्रात घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल तसेच योगाभ्यासाबद्दलच्या अनुभवाबद्दल मंत्र्यांशी चर्चा करतील.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999672)