सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन - 2024 चे साक्षीदार होण्यासाठी "विशेष पाहुणे" म्हणून आमंत्रित केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी साधला संवाद
Posted On:
25 JAN 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री (MSME) नारायण राणे यांनी आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन - 2024 चे साक्षीदार होण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने या लाभार्थ्यांना "विशेष पाहुणे" म्हणून आमंत्रित केले आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा लाभार्थ्यांचे स्वागत करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे याप्रसंगी बोलताना दिली. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार गावातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांना मदतीचा हात देऊन त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे, याचा राणे यांनी विशेष उल्लेख केला. या योजनेमुळे कारागिरांना आणि हस्तकलाकारांना त्यांची कला आणि कौशल्ये सुधारण्यास तसेच नवउद्योजक म्हणून स्वतःला आणि आपल्या उद्योगाला स्थापित करण्यात मदत होईल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा सुरुवात, 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी 18 व्यापारांशी संबंधित कारागीर आणि हस्तकलाकारांना आवश्यक ती सर्व मदत प्रदान करते. या योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण 2,87,964 जणांची यशस्वी नाव नोंदणी झाली आहे.

108 महिला कारागीर तर 148 पुरुष कारागिर या योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या व्यवसायांचे प्रतिनिधित्व करत आहेत. अशाप्रकारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे एकूण 256 लाभार्थी आपल्या जोडीदारासह दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे कारागीर प्रतिनिधी ईशान्येकडील राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांसह 20 राज्यांमधील असून त्यापैकी काही जण आकांक्षी जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999571)