भारतीय निवडणूक आयोग
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट विषयी राष्ट्रव्यापी जनजागृती कार्यक्रम केला सुरू
ह्या जनजागृती अभियानाअंतर्गत, 3500 पेक्षा अधिक प्रदर्शने आणि सुमारे 4250 मोबाईल व्हॅन्स तैनात
Posted On:
18 JAN 2024 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स – ईव्हीएम आणि व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल – व्हीव्हीपॅट विषयी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे, नागरिकांना, मशीन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, ह्या यंत्रांची हाताळणी कशी केली जाते, हे बघता येईल. लोकसभेच्या आणि विधानसभांच्या प्रत्येक सर्वसाधारण निवडणुकांच्या आधी राबवल्या जाणाऱ्या या जनजागृती कार्यक्रमात ईव्हीएमस् आणि व्ही व्ही पॅटची ठळक वैशिष्ट्ये समजावून सांगितली जातात. मतदान कसे केले जाते, त्याची प्रक्रिया, आणि मतदारांनी व्हीव्हीपॅट पावतीवरुन, आपण दिलेलेच मत दिसते आहे की नाही, याची पडताळणी कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक दाखवता येईल. या प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून नागरिकांना, ईव्हीएमस् आणि व्ही व्ही पॅटची सखोल माहिती मिळते. ज्याद्वारे, या विषयीचे गैरसमज दूर होऊन, मतदारांचा मतदान यंत्रणेवरील विश्वास वाढतो, पर्यायाने, निवडणुकीत मतदानाचा टक्का आणि मतदारांचा सहभाग वाढतो.
या कार्यक्रमात 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 613 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 3464 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क आणि जागरूकता उपक्रम समाविष्ट आहेत. (ज्या पाच राज्यांत आता निवडणुका झाल्या ती राज्ये वगळून). ईव्हीएम./व्हीव्हीपॅटची कार्यक्षमता लोकांसमोर प्रत्यक्षपणे दाखवण्यासाठी 3500 हून अधिक प्रात्यक्षिक केंद्रे आणि सुमारे 4250 फिरत्या व्हॅन उभारण्यात आल्या आहेत. या जनजागृती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डीईओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्ययावत माहिती सांगत आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थायी निर्देशांनुसार, राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकांच्या घोषणेच्या अंदाजे 3 महिने आधी एक केंद्रित जनजागृती मोहीम सुरू करणे आवश्यक असते. (आणि यासाठी, आधीच्या निवडणुकांच्या तारखेचा विचार केला जातो.) जागृती मोहिमेचे वेळापत्रक डीईओ, विधानसभा मतदारसंघ/विभागनिहाय अशा स्वरूपात तयार केले जाते आणि ते वेळापत्रक, राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि स्थानिक माध्यमांना देखील दिले जाते.
सार्वजनिक प्रात्यक्षिक कार्यक्रमांसह प्रशिक्षण आणि जागरूकता अशा उद्देशांसाठी ईव्हीएमच्या वापरासाठी आयोगाकडे तपशीलवार मानक कार्यप्रणाली आहे. या कार्यान्वयन प्रणालीत, ईव्हीएम हाताळण्यासाठी आणि साठवण्यासाठी प्रोटोकॉल, डमी चिन्हांसह केवळ एफएलसी-ओके ईव्हीएमचा वापर, प्रशिक्षणादरम्यान तयार झालेल्या व्हीव्हीपॅट स्लिप नष्ट करणे आणि जागरूकता इत्यादींचा समावेश आहे. प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम. ची यादी देखील राजकीय पक्षांना पावतीसह दिली जाते.
अधिक माहितीसाठी, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ईव्हीएम वरील नियमावलीचे 'प्रशिक्षण आणि जागरूकता' या शीर्षकाच्या 5 व्या प्रकरणाचा संदर्भ बघता येईल. (लिंक खालीलप्रमाणे)
https://www.eci.gov.in/eci-backend/public/uploads/monthly_2023_08/EVMManualAugust2023_pdf.1f8976b609ce6fefe9b0fe69d3f848ff
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997599)
Visitor Counter : 693