माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एमआयएफएफ)2024 साठी प्रवेशिका केल्या खुल्या
माहितीपट, शॉर्ट नॉन फिक्शन पट, ॲनिमेशनपट यांच्यात पुरस्कारांसाठी तसेच एकूण 44 लाख रुपयांच्या पारितोषिकांसाठी राहील चुरस
Posted On:
17 JAN 2024 7:25PM by PIB Mumbai
मुंबई , 17 जानेवारी 2024
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (एमआयएफएफ) प्रवेशिका खुल्या करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट महोत्सव माहितीपट, ॲनिमेशनपटांसाठी दक्षिण आशियातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक आहे. 18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मुंबईत 15 जून ते 21 जून 2024 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नॉन-फिक्शन आणि ॲनिमेशन प्रकारातील सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचा उत्सव साजरा करतो तसेच जगभरातील आणि भारतातील चित्रपट निर्मात्यांना सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचा पुरस्कार, प्रतिष्ठा आणि बक्षीस म्हणून एकूण 44 लाख रुपये रोख रक्कम जिंकण्यासाठी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.
या महोत्सवातील तिन्ही श्रेणीतील प्रवेशिका 15 जानेवारीपासून खुल्या झाल्या असून त्या 15 फेब्रुवारीपर्यंत खुल्या राहतील. याशिवाय प्रवेशिका 16 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत विलंब शुल्कासह खुल्या असतील.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केवळ ऑनलाइन असून ती www.filmfreeway.in आणि www.miff.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
चित्रपट निर्माते खालील श्रेणींमध्ये त्यांच्या प्रवेशिका पाठवू शकतात:
स्पर्धा विभाग
1. आंतरराष्ट्रीय स्पर्धा
2. राष्ट्रीय स्पर्धा
पात्रता निकष
1. आंतरराष्ट्रीय स्पर्धा:
- 01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान भारतात किंवा परदेशात निर्मित चित्रपट पात्र आहेत.
2. राष्ट्रीय स्पर्धा:
- 01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान भारतीय नागरिकांनी भारतात बनवलेले चित्रपट पात्र आहेत.
अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे:
- आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अशा एका स्पर्धा विभागात एक चित्रपट प्रविष्ट केला जाऊ शकतो.
- पूर्वीच्या मिफ आवृत्त्यांमध्ये प्रविष्ट केलेले किंवा प्रदर्शित केलेले चित्रपट, त्यांच्या छोट्या आवृत्त्या किंवा सुधारित अथवा पुनर्संपादित आवृत्त्या पात्र असणार नाहीत.
- ॲनिमेशन फीचर फिल्म, चित्रपट मालिका, दूरचित्रवाणी वाहिन्या किंवा केबल टीव्ही किंवा ओटीटी व्यासपीठ आणि इतर कोणत्याही डिजिटल व्यासपीठासाठी बनवलेले किंवा प्रदर्शित केलेले भाग प्रवेशासाठी पात्र नाहीत.
- कॉपीराइट धारण करणार्या कोणत्याही संस्था किंवा एजन्सीद्वारे किंवा वैयक्तिक चित्रपट निर्माते अथवा दिग्दर्शकांद्वारे चित्रपट प्रविष्ट केले जाऊ शकतात. प्रवेशिकांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.
रोख बक्षिसे :
विविध श्रेणीतील पारितोषिकांसाठी निवड झालेल्या सहभागींना एकूण 44 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती:
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित केला जाणारा 1990 मध्ये प्रारंभ झालेला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा दक्षिण आशियातील नॉन फिचर फिल्म साठी सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव सर्जनशीलता, कथाकथन आणि चित्रपट निर्मितीच्या कलेचा उत्सव आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली आयोजक समिती, चित्रपट सृष्टीतील प्रख्यात व्यक्ती, माहितीपट निर्माते आणि चित्रपट समीक्षक यांचा या महोत्सवात सहभाग असतो.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997053)
Visitor Counter : 147