संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलांचे बळकटीकरण आणि माजी सैनिकांचे कल्याण सुनिश्चित करणे हा सरकारचा दृढ संकल्प: लखनौ येथे 76 व्या लष्कर दिनानिमित्त 'शौर्य संध्या' कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन


“दिल्लीच्या बाहेर लष्कर/नौदल/हवाईदल दिन साजरा करण्यामागे देशाची परंपरा आणि लष्करी प्रगती लोकांपर्यंत पोहोचवण्याची संकल्पना”

Posted On: 15 JAN 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024

76 व्या लष्कर दिन सोहोळ्याचे औचित्य साधून 15 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ छावणीत 'शौर्य संध्या' या लष्करी आणि लढाऊ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, निमंत्रित नागरिक आणि लष्करी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशाच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये रुजलेली भारतीय सैनिकाची अनोखी वैशिष्ट्ये संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात उलगडून सांगितली. देशभक्ती, धैर्य, मानवता आणि भारतीय संविधानाप्रती निष्ठा या सैनिकाच्या चार महत्त्वाच्या गुणांचे त्यांनी वर्णन केले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील आपल्या सैनिकांचे योगदान आणि आपत्तींच्या वेळी मदत आणि बचाव तसेच 1971 च्या युद्धात 90,000 पाकिस्तानी सैनिकांसोबतचे त्यांचे आदरपूर्वक वर्तन त्यांच्यातील मानवतेचा पुरावा आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये, आपण सैन्य आणि त्यांची घटनात्मक मूल्ये यांच्यातील विसंवाद पाहतो. परंतु, भारतीय सैन्याची घटनात्मक मूल्यांप्रती असलेली निष्ठा अतुलनीय आणि सर्वमान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय सैन्य केवळ परंपरेवर लक्ष केंद्रित करत नाही तर नवीन नवोन्मेष आणि संकल्पनांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणत असल्याचे सत्य राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. जडत्वाच्या अवस्थेत परंपरा मांडता येत नाही, तर ती निरंतर प्रवाही आणि काळानुरूप बदलणारी असावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा लष्कर/नौदल/हवाईदल दिन दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा निर्णय म्हणजे देशाची परंपरा, लष्करी प्रगती लोकांना अवगत करण्याचे  प्रतीक असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्र्यांनी केले. “आमचे सैन्य ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित आधुनिक शस्त्रे/तंत्रज्ञानाने तसेच सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या भूमिकेने कसे सुसज्ज होत आहे हे देश आता जाणत आहे. प्रत्येक व्यक्तीला सैन्यात सहभागी  होण्याची संधी मिळत नाही, परंतु आजच्या घटनेचे साक्षीदार असलेल्यांना देशाच्या संरक्षणासाठी आमच्या सैन्याची तयारी अनुभवता आली. यामुळे जनता आणि सैनिकांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. हे निश्चितपणे आपल्या तरुणांना सशस्त्र दलात सहभागी  होण्यासाठी किंवा आपल्या सैनिकांप्रमाणेच समर्पण आणि वचनबद्धतेने देशाची सेवा करण्यास प्रेरित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वित्त मंत्रालय, कोणतेही आढेवेढे न घेता, संरक्षण मंत्रालयाने मागितलेला निधी जारी करते, जे सैनिकांप्रती सरकारच्या समर्पणाचे प्रतीक आहे असे राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या सरकारच्या दृढ  संकल्पाविषयी बोलताना सांगितले. केवळ सेवारत सैनिकच नाही तर माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी या प्रसंगी पहिल्या दिवसाच्या टपाल लिफाफ्याचे देखील अनावरण  केले.


S.Kakade/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1996425) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi