संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी डीआरडीओच्या हैदराबाद येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला दिली भेट
Posted On:
14 JAN 2024 6:27PM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी 14 जानेवारी 2024 रोजी डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या हैदराबाद येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला भेट दिली. यावेळी त्यांनी संशोधन केंद्र इमारतीमध्ये (आरसीआय) चालू असलेल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि संबंधित कार्यक्रमांचा आढावा घेतला. महासंचालक, क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली(डीजी,एमएसएस) यू राजा बाबू,यांनी संरक्षण राज्य मंत्री यांना विविध तांत्रिक विकास कार्याची विस्ताराने माहिती दिली. डीआरडीएल, एएसएल आणि आरसीआयच्या प्रयोगशाळा संचालकांनी संरक्षण राज्य मंत्र्यांना संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध तांत्रिक प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.
या प्रसंगी बोलताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले: “डीआरडीओच्या ज्ञानाचा आणि या संस्थेने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग, खाजगी उद्योग क्षेत्राने करून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या देशात स्वावलंबी संरक्षण औद्योगिक परिसंस्थेची स्थापना शक्य होईल”. इतर राष्ट्रांना शस्त्रास्त्र प्रणाली निर्यात करण्यात डीआरडीओ ने जागतिक नेता म्हणून उदयास यावे, असेही ते म्हणाले. आज संरक्षण क्षेत्र हे केवळ जमीन, समुद्र किंवा आकाशापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याने आता अवकाशालाही व्यापून टाकले आहे असे त्यांनी नमूद केले.
अग्नि-प्राइम, आकाश, आकाश-एनजी, प्रलय, यासारख्या अलीकडील यशस्वी मोहिमांसाठी त्यांनी सर्व डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी संरक्षण राज्य मंत्र्यांनी “आत्मनिर्भर भारत" या राष्ट्रीय ध्येयाच्या अनुषंगाने विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वदेशी बनवल्याबद्दल आणि देशातील संरक्षण औद्योगिक क्षेत्राचा पाया अधिक बळकट केल्याबद्दल डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल संस्थेची प्रशंसा केली.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996086)